भार्इंदरमध्ये टोमॅटो व्यावसायिकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:33 PM2019-12-17T23:33:47+5:302019-12-17T23:33:49+5:30
महिलेसह पोलिसाचा त्रास : चिठ्ठी सापडली
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : भार्इंदर पश्चिमेस असलेल्या शिवसेना गल्लीतील महेशनगरमध्ये राहणाऱ्या रमेश पाठक (५१) या टॉमेटो व्यावसायिकाने मंगळवारी सकाळी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या चिठ्ठीत एका पोलिसासह महिला व तिच्या मुलाचा उल्लेख केला आहे.
रमेश पाठक यांनी महेशनगरातील सदनिका २0१३ साली नयना यांना ३ लाख रुपयांच्या अनामत रकमेवर विनाभाड्याने दिली होती. तिथे नयना दोन मुलांसह राहत होत्या. ही सदनिका २0१७ मध्ये नयना यांनी रिकामी केली असली. मात्र अनामत रक्कम व भाडे करारावरून वाद सुरू होता. अनामत रक्कम परत मिळाली नसल्याचे नयना सांगत होत्या, तर पाठक कुटुंब मात्र अनामत रक्कम देऊनदेखील नयना करारनाम्याची प्रत देत नसल्याचा दावा करत आहे. अशातच मंगळवारी पाठक यांनी आत्महत्या केली. त्यांनी लिहलेल्या चिठ्ठीत नयना, लालू व कदम हे पाच लाख रुपये मागत होते. तशी कागदपत्रेही करून देण्यासाठी ते सांगत होते, असे लिहिले आहे. भार्इंदर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून नयना व लालू यांची चौकशी सुरू केली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
पैशासाठी होता तगादा
नयना, त्यांचा मुलगा लालू व कदम नावाच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसाने पैसे देण्यासाठी पाठक यांच्याकडे तगादा लावला होता. सोमवारी एका वकीलाकडे पाठक यांना कागदपत्रे बनवून घेण्यासाठी बोलावले होते. पण वकील नसल्याने कागदपत्रे झाली नाही.