हवालदारासह एकास कल्याणमध्ये मारहाण
By Admin | Published: May 20, 2017 04:50 AM2017-05-20T04:50:09+5:302017-05-20T04:50:09+5:30
पश्चिमेतील शिवाजी चौकात उभ्या केलेल्या मोटारीला वाहतूक विभागाने जॅमर लावल्याने वाहतूक पोलीस हवालदारआणि क्रेनवरील कर्मचाऱ्यास मारहाण करण्यात
- लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : पश्चिमेतील शिवाजी चौकात उभ्या केलेल्या मोटारीला वाहतूक विभागाने जॅमर लावल्याने वाहतूक पोलीस हवालदारआणि क्रेनवरील कर्मचाऱ्यास मारहाण करण्यात आल्याची घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी एकास अटक केली आहे. तर मुख्य आरोपी, त्याची पत्नी आणि अन्य तिघांचा शोध घेतला आहे.
इमान खतरी आणि त्याची पत्नी काही कामानिमित्त गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास मोटारीने शिवाजी चौकात आले होते. मात्र खतरी यांनी त्यांची मोटार रस्त्यात चुकीच्या जागी उभी केल्याने तेथे वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे क्रेनवरील कर्मचारी दर्शन शिंदे यांनी मोटारीला जामर लावला. खतरी मोटारीजवळ परतल्यानंतर त्यांना ही बाब समजली. जामर काढून त्यांनी तो चोरण्याचा प्रयत्न करताच शिंदे यांनी त्यांना मनाई केली. तसेच त्यांचे फोटो काढले. त्या रागातून खतरी आणि त्यांच्या पत्नीने शिंदे यांनी शिवीगाळ सुरू केली आणि शिंदे यांना ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. ते तेवढ्यावर थांबले नाहीत. तर त्यांनी मुस्ताक खतरी (५०, रा. पत्रीपूल) आणि अन्य तीन नातेवाइकांना फोन करून बोलावले. या तिघांनी तेथे पोहोचताच शिंदे यांना बांबूने मारहाण केली. त्यामुळे तेथे गर्दी जमली.
हा प्रकार सुरू असताना वाहतूक पोलीस चंद्रशेखर कदम हे शिंदे यांच्या मदतीसाठी धावताच आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. नंतर कदम यांनी मदतीसाठी प्रयत्न करताच त्या सर्वांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात कदम यांच्याकडून गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शोध घेऊन रात्री प्रथम मुस्ताकला अटक केली. पळून गेलेले उर्वरित आरोपी इमान, त्याची पत्नी आणि अन्य तिघा साथीदारांचा शोध सुरू आहे.
मुस्ताकला पोलीस कोठडी
या घटनेत, मारहाणीत नंतर सहभागी झालेला आरोपी मुस्ताक खतरी याला महात्मा फुले चौक पोलिसांनी शुक्रवारी कल्याणच्या न्यायालयात हजर केले. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती तपास अधिकारी ए. पी. लांब यांनी दिली.