ठाण्यात कामगाराची आत्महत्या: मृत्यु दाखल्यासाठी पोलिसांना करावी लागली नऊ तासांची भटकंती

By जितेंद्र कालेकर | Published: April 22, 2020 11:49 PM2020-04-22T23:49:33+5:302020-04-23T00:33:23+5:30

केवळ काही ठराविक नियमांवर बोट ठेवत एखाद्या सामान्य नागरिकाला तिष्ठत ठेवणे हे सरकारी कार्यालयांमधून अनेकदा पहायला मिळते. असाच अनुभव आत्महत्या केलेल्या कामगाराच्या पत्नीला आणि कापूरबावडी पोलिसांना नुकताच आला. या कामगाराच्या मृत्युच्या दाखल्यासाठी आणि शवविच्छेदनासाठी तब्बल नऊ तासांची भटकंती करावी लागण्याची वेळ पोलिसांवर आली. संवेदनाहहिन यंत्रणेचा हा फटका गेल्या तीन दिवसांमध्ये दोन कुटूंबियांना बसल्यामुळे सखेद संताप व्यक्त होत आहे.

 Suicide of a worker in Thane: Police had to wander for nine hours to get a death certificate | ठाण्यात कामगाराची आत्महत्या: मृत्यु दाखल्यासाठी पोलिसांना करावी लागली नऊ तासांची भटकंती

ठाण्यात कामगाराची आत्महत्या: मृत्यु दाखल्यासाठी पोलिसांना करावी लागली नऊ तासांची भटकंती

googlenewsNext
ठळक मुद्दे दोन दिवसांमधील तिसरी घटना संवेदनाहिन यंत्रणेचा नातेवाईक आणि पोलिसांनाही फटका

जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: घरातील कौटूंबिक कलहातून राजू विजय रेड्डी (४५, रा. गजानन रहिवासी चाळ, मानपाडा, ठाणे) याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. पंचनाम्यानंतर त्याच्या मृत्युच्या दाखल्यासाठी कापूरबावडी पोलिसांना चक्क नऊ तासांची भटकंती करावी लागली. अखेर मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला.
राजू रेड्डी याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर २१ एप्रिल रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास कापूरबावडी पोलीस घटनास्थळी पोहचले. त्याने मानपाडा येथील घरातील छताच्या हुकाला नायलॉनच्या रस्सीने गळफास घेतल्याचे आढळले. त्याचा मृतदेह थेट ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णवाहिकेतून पोलिसांनी ८.३० वाजता नेला. मात्र, हे कोरोनासाठीच्या रुग्णांसाठी असल्यामुळे याठिकाणी शवविच्छेदन होणार नाही आणि त्यामुळे मृत्युच्या कारणाचा दाखलाही देता येणार नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ही रुग्णवाहिकाही रुग्णालयाच्या बाहेरच थोपविण्यात आली. तिथून नातेवाईक आणि मृतदेह असलेली रुग्णवाहिका घेऊन पोलीस कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेले. तिथे मृतदेह आत घेण्यात आला. पण मृतदेहाच्या शवविच्छेदनास त्यांनी नकार दिला. तसेच पालिका आयुक्तांचे आदेश असून हद्दीचे कारण दाखवत तेथील डॉक्टरांनी शवविच्छेदनाला नकार दिला. ज्याचा मृत्यु झाला त्याची ४० वर्षीय पत्नी आणि तीन मुले आहेत. मोलमजूरी करणारे हे कुटूंब असून त्यांना कोणाचाही आधार नाही. रुग्णवाहिकेचा खर्चही पोलिसांनी पदरमोड करुन केला, असेही या पोलिसांनी तेथील डॉक्टरांना सांगितले. पण तरीही या शवविच्छेदनाला तेथील डॉक्टरांनी नकार दिला. हे सर्व करण्यासाठी कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या एका अधिकाºयाला जिल्हा रुग्णालय ते कळवा रुग्णालय असे तीन ते चार वेळा हेलपाटे मारावे लागले. या सर्व लालफितीमध्ये मरणानंतरही राजू रेड्डी या कामगाराचा मृतदेह रुग्णवाहिकेतच ताटकळला होता. अखेर एका नगरसेवकाच्या निदर्शनास ही बाब पोलिसांनी आणून दिली. या नगरसेवकाने सूत्रे हलविल्यानंतर शेवटी जिल्हा रुग्णालयाने शवविच्छेदनाला मान्यता दिली. त्यानंतर सायंकाळी ५.३० च्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. पोलीस बरोबर असूनही एका सामान्य महिलेला आपल्या पतीच्या मृत्युच्या दाखल्यासाठी कोरोनामुळे भटकंती करावी लागली. एकीकडे कोरोनाला घाबरु नका पण खबरदारी घ्या असे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या भीतीपोटी मृत्युनंतरही सामान्य नागरिकांना असे हाल सोसावे लागत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे सलग दुसºया दिवशी असाच अनुभव पोलिसांना आला आहे. सोमवारीही आकाश जाधव याच्या आत्महत्येनंतर चितळसर पोलिसांनाही मृत्युच्या दाखल्यासाठी अशीच सुमारे सहा तासांची भटकंती करावी लागली.
 

‘‘ यापूर्वीही कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या वागळे इस्टेट येथील मुलीला उपचारासाठी नाकारण्यात आले होते. आता चितळसर आणि मानपाडयातील या दोन घटनांमध्येही पुन्हा हे समोर आले आहे. या दोन्ही प्रकरणांची चौकशी केली जाईल. असे प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी पालिका आयुक्तांनाही पत्रव्यवहार केला जाईल.’’
अविनाश अंबुरे, पोलीस उपायुक्त, वागळे इस्टेट
 

Web Title:  Suicide of a worker in Thane: Police had to wander for nine hours to get a death certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.