मतदानाच्या सेल्फीतून मालमत्ताकरात सूट
By Admin | Published: February 18, 2017 06:44 AM2017-02-18T06:44:47+5:302017-02-18T06:44:47+5:30
मतदान करण्यासाठी रहिवाशांनी पुढे यावे यासाठी निवडणूक अधिकारी व आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी मतदाराने
उल्हासनगर : मतदान करण्यासाठी रहिवाशांनी पुढे यावे यासाठी निवडणूक अधिकारी व आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी मतदाराने मतदान केल्यानंतर सेल्फी काढून तो महापालिकेने दिलेल्या नंबरवर पाठवायचा आहे. अशारितीने प्रत्येक वॉर्डातून प्रत्येकी ५ प्रमाणे ड्राद्वारे १०० मतदारांची लॉटरी काढण्यात येणार असून विजेत्यांना मालमत्ताकरात २५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
जागृती अभियान रॅली
निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पालिकेने मतदार जागृती अभियान रॅली काढली होती. त्यामध्ये राजेंद्र निंबाळकर, उपायुक्त विजया कंठे, जमीर लेंगरेकर, सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, नागरिक सहभागी झाले होते.
मतदार जागृती अभियानांतर्गत चित्ररथ काढून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले. शहराच्या विविध भागांतून मतदार जागृती रथ फिरवून मतदारांना मतदार केंद्र, नाव आदी माहिती घरपोच दिली जाणार असल्याचे या वेळी आयुक्तांनी सांगितले. त्यासाठी पालिकेने स्वच्छता निरीक्षक यांची नियुक्ती केली असून त्यांची नावे व फोन नंबरसह माहिती देण्यात आली आहे. उल्हासनगरातील मतदान टक्का अत्यंत कमी आहे. याबाबत, राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी शहर दौऱ्यादरम्यान चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर, निंबाळकर यांनी हॉटेलमालक, व्यापारी संघटना, रिक्षा-चालक-मालक संघटना यांची बैठक घेऊन मतदार जनजागृती अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. सर्व संघटनांनाही अभियानात सहभागी करून घेऊन अप्रत्यक्ष सहकार्य करणे सुरू केले आहे. हॉटेलमालक संघटनेने मतदान केल्याचा पुरावा दाखवा आणि हॉटेलात २० टक्के सूट मिळवा, असे प्रसिद्धिपत्रकच काढले आहे. (प्रतिनिधी)