विशेष मुलांच्या ‘सोबती’ केंद्राचा रविवारी वर्धापन दिन; अनिल अवचट यांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:03 PM2020-01-13T23:03:05+5:302020-01-13T23:03:13+5:30
मदतीचे आवाहन, संस्थेत मुंबई-ठाणे परिसरातील १२० पालक सभासद
ठाणे : विशेष मुलांचे पुनर्वसन कसे करावे, याचे आदर्श उदाहरण असलेल्या सोबती संस्थेचा वर्धापन दिन १९ जानेवारीला वाडा तालुक्यातील तिळसा येथील निवासी केंद्रात साजरा होत आहे. या सोहळ्यानिमित्त सुप्रसिद्ध लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट सोबती ला भेट देणार असून ज्येष्ठ पत्रकार सदा डुम्बरे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. समस्या आपली आहे, तर त्यावर उपायही आपणच शोधला पाहिजे, या भावनेने सोबती परिवारातील पालकांनी अखंड प्रयत्न आणि कष्टाने वाडा तालुक्यात देखणे, अद्ययावत निवासी संकुल साकारले आहे.
सोबतीतील पालकांपुढे दुहेरी आव्हान आहे. कारण, या परिवारातील मुले अंध आहेतच, शिवाय त्याचबरोबरीने स्वमग्नता, कर्णबधिरत्व, गतिमंदत्व, सेरेब्रल पाल्सी (मेंदूचा पक्षाघात) आदी व्याधीही आहेत. या समस्या भेडसाविणाऱ्या सर्व कुटुंबांनी एकत्र आले पाहिजे, या विचारातून सोबती संस्थेचा जन्म झाला. २००४ मध्ये सोबती पॅरेंट्स असोसिएशन या संस्थेची अधिकृत नोंदणी झाली. सध्या संस्थेत मुंबई-ठाणे परिसरातील १२० पालक सभासद आहेत. २००७ मध्ये ठाण्यात एका विश्वस्त संस्थेच्या जागेत १०-१२ वर्षांवरील मुलामुलींसाठी सोबतीने व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू केले. प्रशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलेमुली आपापल्या क्षमतेनुसार मणी ओवणे, कुटून मसाले बनविणे, वजन करणे, पॅकिंग करणे, घरघंटी चालविणे अशी कामे शिकली.
मुलांना उद्योगात ठेवणे महत्त्वाचे होतेच, पण त्याचबरोबर आपल्यानंतर मुलांचे काय, या चिंतेतून कायमस्वरूपी निवासी पुनर्वसन केंद्राची स्थापना करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. माजी आमदार विवेक पंडित यांनी वाडा तालुक्यातील तिळसा येथील त्यांच्या मालकीची पाऊण एकर जमीन संस्थेला विनामूल्य उपलब्ध करून दिली. त्यानंतर वास्तू उभारण्यासाठी संस्थेच्या सभासदांनी निधी संकलनाचे प्रयत्न सुरू केले.
निवासी केंद्रात १५ मुलांचे वास्तव्य
तीन वर्षांपूर्वी सोबतीचे हे निवासी केंद्र सुरू झाले. या केंद्रात मुले सोमवारी सकाळी येतात आणि पुढील पाच दिवस राहून शुक्र वारी दुपारी आपल्या घरी परत येतात. मुले आणि प्रशिक्षकांच्या सोयीसाठी बस सुविधा आहे. तिळसातील केंद्र अतिशय अद्ययावत आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. या केंद्रात सकाळी ७ पासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत मुलांचे वेळापत्रक ठरवून देण्यात आले आहे. मुलांनी त्यांचे दात घासणे, प्रातर्विधी, अंघोळ, कपडे घालणे या दैनंदिन क्रि यांच्या बाबतीत जास्तीतजास्त स्वावलंबी व्हावे, यादृष्टीने केंद्रात प्रयत्न केले जातात. या निवासी केंद्रात सध्या १४ मुले आणि एक मुलगी असे १५ जण वास्तव्यास असून सहा प्रशिक्षक कायमस्वरूपी त्यांच्यासोबत असतात.