रविवार... खरेदीवार! पाहाल तिकडे गर्दीच गर्दी!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 06:47 AM2017-10-16T06:47:21+5:302017-10-16T06:47:28+5:30

खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांनी फुलून गेलेले रस्ते, पाहाल तिकडे माणसेच माणसे आणि त्यांनी उभी केलेली वाहने यामुळे दिवाळीपूर्वीचा रविवार खरेदीवार ठरला.

 Sunday ... shopping! See crowd crowd! | रविवार... खरेदीवार! पाहाल तिकडे गर्दीच गर्दी!  

रविवार... खरेदीवार! पाहाल तिकडे गर्दीच गर्दी!  

Next

ठाणे : खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांनी फुलून गेलेले रस्ते, पाहाल तिकडे माणसेच माणसे आणि त्यांनी उभी केलेली वाहने यामुळे दिवाळीपूर्वीचा रविवार खरेदीवार ठरला. सकाळीच नव्हे, तर संध्याकाळीही पडलेल्या पावसाने काही काळ सर्वांचीच त्रेधा उडवली. फटाक्यांच्या विक्रीवरून मतमतांतरे सुरू असली ढगांचा कडकडाट आणि विजांच्या चमचमाटाने ती कसर भरून
काढली.
यातही दुकाने जशी सजलेली आणि गर्दीने भरलेली दिसत होती, तशीच रस्तोरस्तीही छोट्या विक्रेत्यांनी दिवाळीसाठी नाना वस्तुंच्या विक्रीची परंपरा जपली होती. कुठे खांद्यावर काठी घेऊन त्याला लटकवलेल्या छोट्या कंदिलाची विक्री करणारे विक्रेते नजरेस पडत होते तर कुठे रस्त्याकडेला रंगीबेरंगी रांगोळ््याची विक्री सुरू होती. कोणी हार फुले विकत होते, तर कोणी लाह्या, कुरमुरे, चिराटे विकत होते.
संध्याकाळी पाऊस येईल या भीतीने बहुतांश ठाणेकरांनी दुपारीच खरेदीचा मुहूर्त साधला. त्यामुळे संध्याकाळपेक्षा दुपारी जास्त गर्दी असल्याचे निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदविले. पण संध्याकाळीही अवचित पावसाने खरेदी करणाºयांना गाठलेच. पावसाच्या सरी कोसळू लागताच आजूबाजूच्या मिळेल त्या दुकानात शिरून नागरिकांनी काही काळ आसरा घेतला.
दिवाळीच्या साहित्यासाठी, नवीन कपडे-दागिने खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. फुले, मिठाईच्या खरेदीसाठीही झुंबड उडाल्याचे दिसत होते. फक्त नजर फिरवावी आणि पाहून थक्क व्हावे अशा प्रमाणात लोकांच्या गर्दीचा महापूर पाहायला मिळत होता. वाहन खरेदीसाठीचे बुकिंग, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजनाला लागणाºया सोन्याचे बुकिंग यासह महत्त्वाची खरेदी रविवारीच झाली.
त्याचबरोबर कंदिल, पणत्या, रांगोळी, फराळ, उटणे, स्टिकर्स, रोषणाईचे साहित्य, तोरणे, चिराटे यांची खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली.

पावसाने दिवाळे काढले: विक्रेत्यांचा आक्रोश
ढगांच्या गडगडाटासह संध्याकाळी सुरू झालेल्या पावसाने ठाणेकरांची त्रेधा उडाली. सकाळी पाऊस पडल्याने संध्याकाळच्या खरेदीवर मोठ्या आशेने नजर ठेवून असलेल्या विक्रेत्यांनी मात्र ‘पावसाने दिवाळीचे दिवाळे काढले.’ अशा शब्दांत आक्रोश व्यक्त केला. रिमझिम सुरू झालेल्या पावसाने नंतर मुसळधार कोसळण्यास सुरूवात केली. पण या पावसातही खरेदी सुरू होती.

गजरे महाग, मोगरा "१२०० वर
सण - उत्सवाच्या काळात महिलांकडून गजºयांची ोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. वाढत्या मागणीमुळे दरही वधारतात. ऐन दिवाळीत मोगरा १२०० रुपयांवर पोहोचला. दिवाळीपूर्वी ५० रुपयांला सहा नग प्रमाणे विकला जाणारा मोगºयाचा गजरा दिवाळीच्या तोंडावर ५० रुपयाला एक आणि १०० रुपयाला तीन याप्रमाणे विकला जातो आहे. ग्राहक जरी घासाघीस करत असले, तरी वाढलेल्या दरामुळे आम्हालाही स्वस्त दरात गजरे विकणे अशक्य असल्याचे विक्रेत्या दक्षा नालबन यांनी सांगितले. गजºयाचे दर दुप्पट होतील, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

मेगाब्लॉकचे विघ्न
दिवाळीच्या खरेदीचा माहोल असतानाही मध्ये रेल्वेवरील मेगाब्लॉकने खरेदीसाठी बाहेर पडणाºयांचे अतोनात हाल झाले. मुंबईकडे जाणाºया धीम्या मार्गावर ब्लॉक असल्याने मालगाड्या, मेल-एक्स्प्रेस आणि लोकल एकाच मार्गावरून धावत होत्या. परिणामी रेल्वे वाहतुकीचा अक्षरश: बोजवारा उडाला. त्यातून सहकुटुंब खरेदीसाठी बाहेर पडणाºयांचे हाल झाले.

आसपासच्या विक्रेत्यांचीही भर
जांभळी नाक्याची बाजारपेठ ही ठाण्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ ओळखली जाते. सण-उत्सवाच्या काळात येथे स्थानिकच नव्हे, तर शहराबाहेरील ग्रामीण भागांतून छोटे छोटे विक्रेते रोजीरोटीसाठी येतात. असेच विक्रेते दिवाळीच्या निमित्तानेही पाहायला मिळाले. जांभळी नाक्याच्या फुटपाथवर चिराट्याची विक्री करणाºया महिला विक्रेत्या नजरेस पडल्या. अंबाडी आणि भिवंडीच्या चिंबीपाडा येथून आलेल्या या महिला चिराटे, कडुनिंबाची पाने, कणसे, झेंडुच्या फुलांची विक्री करीत होत्या. फुटपाथवर छोटेसे कापड पसरुन त्यात छोटे छोटे ढीग रचून विक्री होत होती.

Web Title:  Sunday ... shopping! See crowd crowd!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.