सुनील म्हसकर ठरले ग्लोबल टीचर पुरस्काराचे मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:27 AM2021-07-11T04:27:10+5:302021-07-11T04:27:10+5:30
वासिंद : वासिंदजवळील पाली गावात राहणारे व ठाणे येथील श्रीरंग विद्यालयाच्या माध्यमिक विभागाचे साहाय्यक शिक्षक सुनील म्हसकर हे ...
वासिंद : वासिंदजवळील पाली गावात राहणारे व ठाणे येथील श्रीरंग विद्यालयाच्या माध्यमिक विभागाचे साहाय्यक शिक्षक सुनील म्हसकर हे ए.के.एस. वर्ल्डवाईड प्रा. लिमिटेड या शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवरील फाउंडेशनच्या ग्लोबल टीचर अवॉर्ड २०२० या आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
या पुरस्कारासाठी जगातील ११० हून अधिक देशांतील शिक्षक सहभागी झाले होते. त्यातील फक्त निवडक उपक्रमशील शिक्षकांना गौरविण्यात आले आहे. यांत शिक्षक सुनील म्हसकर यांचाही गौरव झाला आहे. दिल्ली येथे संपन्न होणारा भव्य पुरस्कार सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मात्र ऑनलाइन व्हर्च्युअल स्वरूपात नुकताच पार पडला. श्रीरंग एज्युकेशन सोसायटी, ठाणे या संस्थेचे सचिव प्रमोद सावंत यांच्या शुभ हस्ते आणि संचालक मधुकर देशपांडे, मुख्याध्यापक नितीन तावडे यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष स्वरूपात नुकताच सुनील म्हसकर यांना संस्थेच्या कार्यालयात हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांनाच नव्हेतर, युवकांना घडविण्यासाठीही ते कसोशीने प्रयत्न करीत आहेत. १९९७ पासून ते स्वामी विवेकानंद संस्था, पाली या संस्थेचा संस्थापक, अध्यक्ष म्हणून विविध स्पर्धा, शिबिर, उपक्रम राबवतात. तसेच अजूनही ते स्वत:सुद्धा विविध स्पर्धा, शिबिर, प्रशिक्षण, उपक्रम, कार्यक्रम याचबरोबर बागकाम, शेती, पाककृती यांतून सहभाग घेऊन स्वतःला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतात. अध्यापनादरम्यानही ते विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवतात. म्हसकर यांचे स्वतःचे सुमारे एक हजारांहून अधिक पुस्तके असणारे छोटे ग्रंथालय आहे. आजपर्यंत त्यांना तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील मिळून ३० हून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. याच कामाची दखल घेत त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळाला आहे.