संजय राऊतांना ठार मारण्याची सुपारी; ठाणे पोलिसांनी घेतला जबाब
By जितेंद्र कालेकर | Published: February 22, 2023 07:33 PM2023-02-22T19:33:21+5:302023-02-22T19:33:28+5:30
कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला ठार मारण्यासाठी आणि हल्ला करण्यासाठी ठाण्यातील कथित गुंड राजा ठाकूर याला सुपारी दिल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केला होता.
ठाणे: कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला ठार मारण्यासाठी आणि हल्ला करण्यासाठी ठाण्यातील कथित गुंड राजा ठाकूर याला सुपारी दिल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केला होता. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने त्यांचा नाशिक येथे जाऊन जबाब घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्टात सत्तांतर झाल्यानंतर लगेच आपली सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली. याच काळात सत्ताधारी पक्षाचे आमदार तसेच गुंड टोळयांकडून आपल्याला धमक्या येण्याचे प्रकार घडले. ठाण्यातील एक गुंड ठाकूर याच्याकडून जीवे मारण्याची सुपारी दिल्याची आपल्याकडे पक्की माहिती असल्याचे पत्र खासदार राऊत यांनी मुंबई आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना दिले आहे. याचीच गांभीर्याने दखल घेत ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजित सिंग यांनी गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाकडे याबाबत तपासाचे आदेश दिले. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांचे पथक राऊत यांचा जबाब घेण्यासाठी नाशिक येथे रवानाही झाले.
या पथकाने त्यांचा जबाब घेतला असून गोपनियतेच्या दृष्टीने या जबाबातील तपशील उघड करता येणार नसल्याचे ठाण्यातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. तक्रारदाराकडून माहिती घेणे आवश्यक असल्यामुळे त्यांचा हा जबाब घेण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.