येत्या बुधवारी रात्री 'सुपर-ब्ल्यू मून' दर्शन! कधी आहे तो योग, जाणून घ्या
By प्रज्ञा म्हात्रे | Published: August 28, 2023 12:48 PM2023-08-28T12:48:29+5:302023-08-28T13:09:31+5:30
ब्लू मून म्हणजे काय? त्यात खास गोष्ट काय?
प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: बुधवारी 30 ऑगस्ट रोजी रात्री आपणास सुपर-ब्लूमून दर्शन होणार असल्याचे खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, ज्या इंग्रजी महिन्यात 2 पौर्णिमा येतात, त्या दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्रास 'ब्ल्यू मून ' म्हणतात. यावर्षी ऑगस्ट महिन्यात दोन पौर्णिमा आल्या आहेत. बुधवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10-58 वाजता पौर्णिमेस प्रारंभ होत असून गुरुवार 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7-05 वाजता पौर्णिमा संपते.
तसेच पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्याजवळ आला तर त्याचे बिंब 14टक्के मोठे आणि 30 टक्के जास्त तेजस्वी दिसते. बुधवार 30 ऑगस्ट रोजी रात्री आपणास सुपर-ब्ल्यू मूनचे दर्शन होणार आहे. त्यादिवशी सायं. 6-40 वाजता चंद्र पूर्वेला उगवेल. उत्तररात्री 5-19 वाजता पश्चिमेला मावळेल. तहेच चंद्र पृथ्वीच्याजवळ 3 लक्ष 57 हजार 182 किलोमीटर अंतरावर येणार आहे. आकाश निरभ्र असेल तर बुधवारी 30 ऑगस्ट रोजी रात्रभर आकाशात सुपर ब्ल्यूमूनचे साध्या डोळ्यांनी दर्शन घेता येणार आहे. यानंतर पुढच्यावर्षी 2024 मध्ये 18 सप्टेंबरला सुपरमूनचे दर्शन होणार आहे असेही सोमण यांनी स्पष्ट केले.