चिमुकल्यांत सुपरहीरो, तरुणींमध्ये स्वॅग ब्रोची क्रेझ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 02:19 AM2019-08-12T02:19:53+5:302019-08-12T02:21:19+5:30
भाऊबहिणीचे अतुट बंधन असलेला राखीपौर्णिमा हा सण अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपला आहे.
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : भाऊबहिणीचे अतुट बंधन असलेला राखीपौर्णिमा हा सण अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपला आहे. यानिमित्ताने विविध प्रकारांच्या राख्यांनी बाजारपेठा सजल्या असल्या तरी पावसाच्या तडाख्याने खरेदीची गर्दी मात्र ओसरलेली आहे. यंदा छोट्यांपासून मोठ्यांना वेड लावलेल्या पब्जी आणि सुपरहिरोचा बोलबाला राख्यांमध्येही दिसून येत आहे. तरुणींमध्ये ‘ब्रो’ राखी तर महिलांमध्ये अॅण्टिक कुंदन राखींची क्रेझ आहे.
रंगीबेरंगी राख्यांनी बाजारपेठांपासून दुकाने सजली आहेत. परंतु, यंदा पावसाने धुमाकूळ घातल्याने राख्यांच्या खरेदीला दरवर्षीसारखी गर्दी दिसून येत नाही. राखीपौर्णिमा हा सण जवळ आला की, राख्यांच्या खरेदीला १५ दिवसांपासून सुरुवात होते. परंतु, यंदा अतिवृष्टीमुळे राख्या खरेदीसाठी होणारी गर्दी खोळंबली होती, आता हळूहळू महिलावर्ग खरेदीला बाहेर पडत आहे, असे निरीक्षण चंद्रेश चेढीया यांनी नोंदविले. लहानमुलांसाठी म्यझिक, लाईट्स, गाण्यांच्या राखी आल्या आहेत. कार्टुन्स राख्यांनी त्यांना वेड लावले आहे. त्यांच्यासाठी बाजारात छोटा भीम, बालहनुमान, अँग्री बर्ड, कृष्णा, बॅटमॅन, मोटू पतलू, मिनी, स्पायडरमॅन, स्माईलिज, पिकाचू तर गाड्यांमध्ये चारचाकी, विमानाची राखी, प्रोजेक्टर राखी, लाईट स्पीनर राखी, सुपरहिरोमध्ये अमेरिका कॅप्टन, स्पायडरमॅन, सुपरमॅन अशा अनेक प्रकारांच्या राख्या आहेत. ४० ते ८० रुपयांपर्यंतच्या या राख्या आहेत.
तरुणींसाठी यंदा नविन राखी आली आहे ती म्हणजे ‘ब्रो’, ‘भाई’ राखी. यात एमबीए ब्रो, एनआरआय ब्रो, कुल ब्रदर, सीए भाई, डॉक्टर ब्रो, स्वॅग ब्रो, ब्रो नं १ या राख्या दिसून येत आहे. या त्यांचे लक्ष वेधले आहे.
प्युअर गोल्डची राखी
पाच रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंतची राखी बाजारात आहे. प्युअर गोल्डची राखी विशेष पॅकिंग केलेली बाजारात पाहायला मिळत आहे. ती दोन हजार रुपयांना मिळत आहे.
पूजा थाळीदेखील उपलब्ध
आपल्या लाडक्या भाऊरायाला ओवाळणी करताना लागणारे पुजेची थाळी बहिण आपल्या हाताने सजवित असते. पुजेचे सर्व सामान उपलब्ध असलेली रेडीमेड थाळी बाजारात आली आहे. यात कुंकू, तांदूळ, राखी उपलब्ध आहे. सध्या बहिण - भावाला गिफ्ट देण्याचा ट्रेण्ड सुरू आहे. त्यानुसार गिफ्ट पॅक उपलब्ध आहेत.
विशेष मुलांच्या
राख्यांची दुबईवारी
दरवर्षीप्रमाणे यंदाही विश्वास संस्थेच्या विशेष मुलांनी आकर्षक राख्या बनविल्या आहेत. संस्थेच्या मुख्याध्यापिका मीना क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली २५ विशेष मुलांनी ५०० हून अधिक राख्या आपल्या कल्पकतेतून साकारल्या आहेत. त्यात गोंडा राखी, मोती राखी प्रामुख्याने बनविल्या आहेत. यातील २५ राख्या या दुबईला गेल्या आहेत. या विशेष मुलांनी तयार केलेल्या राख्यांचे भारताबाहेरही कौतुक होत आहे. अनाथ आश्रमासाठी ३५० राख्यादेखील काही संस्थांनी नेल्या आहेत. अनेकांनी मागणी केली असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
मनोरुग्णांच्या राख्याही विक्रीसाठी सज्ज
मनोरुग्णांंच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात त्यांच्याकडून राखी पौर्णिमेनिमित्त याही वर्षी राख्या बनवून घेण्यात आल्या आहेत. मनोरुग्णालयाच्या व्यवसाय उपचार विभागात त्यांना त्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. यात २५ महिला सहभागी होत्या. तब्बल ७०० राख्या या महिलांनी बनविल्या असून जुलै महिन्यापासून त्या बनविण्याचे काम सुरू होते. मनोरुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संजय बोदाडे आणि उपअधिक्षक डॉ. रिटा परवडे यांच्या मार्गदर्शनाने त्या बनवल्या. त्या आता विक्रीसाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत.
परदेशात राहणाऱ्या भावासाठी त्यांच्या बहिणींनी १५ दिवसांपूर्वी राखी खरेदी केली असली तरी शहरात कोसळणारा मुसळधार पाऊस पाहता स्थानिक महिलांनी खरेदीला सुरुवात केलेली नाही. गुरुवारी थोड्या महिला खरेदीसाठी बाहेर आल्या.- चंद्रेश देढीया