भिवंडीत रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या धाब्यांवर कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षकांचे निर्देश
By नितीन पंडित | Published: October 23, 2023 05:30 PM2023-10-23T17:30:09+5:302023-10-23T17:30:32+5:30
धाब्यांवर ठाणे मुंबई मुंब्रा कल्याण वसई व इतर आजूबाजूच्या परिसरातून जेवणासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात.
भिवंडी: भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल व धाबे मोठ्या प्रमाणात वाढले असून हे धाबे नियमांचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत सुरू असतात तर काही ढाबे पहाटेपर्यंत सुरू असतात. या धाब्यांवर ठाणे मुंबई मुंब्रा कल्याण वसई व इतर आजूबाजूच्या परिसरातून जेवणासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात.
रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या धाब्यांवर अनेक अवैध धंदे होत असल्याच्या तक्रारी पोलीस प्रशासनाकडे येत असून अनेक वेळा धाब्यांवर हाणामारीच्या घटनांना वाढल्या असल्याने नियमांचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या धाब्यांवर कारवाई करणे गरजेचे असल्याची मागणी येथील नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे केली होती.
या संदर्भात सोमवारी ठाणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने भिवंडीत एका पत्रकार परिषदेसाठी आले असता रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या नियमबाह्य धाब्यांवर संबंधित पोलिसांनी माहिती घेऊन त्वरित कारवाई करावी असे निर्देश देशमाने यांनी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांना दिली असून भिवंडी तालुका पोलीस ठाण्या बरोबरच पडघा पोलीस ठाणे व गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नियमबाह्य धाब्यांवर देखील कारवाई करण्याचे निर्देश देशमाने यांनी पोलीस यंत्रणेला दिले आहेत.