पुरवठा विभागाच्या ‘त्या’ ९० धाडी रित्याच
By admin | Published: October 31, 2015 12:05 AM2015-10-31T00:05:53+5:302015-10-31T00:05:53+5:30
अवैध साठ्याविरोधात ठाणे जिल्हा पुरवठा विभागाने ग्रामीण भागात हाती घेतलेल्या धाडसत्रांची संख्या ९३ वर पोहोचली आहे. यामध्ये ९० धाडींत पुरवठा विभागाला हात हलवत परतावे लागले आहे
पंकज रोडेकर, ठाणे
अवैध साठ्याविरोधात ठाणे जिल्हा पुरवठा विभागाने ग्रामीण भागात हाती घेतलेल्या धाडसत्रांची संख्या ९३ वर पोहोचली आहे. यामध्ये ९० धाडींत पुरवठा विभागाला हात हलवत परतावे लागले आहे. अवघ्या तीन धाडींत पुरवठा विभागाच्या हाती मसूरडाळ आणि खाद्यतेलाचा साठा हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मागील काही दिवसांपासून बाजारपेठेत डाळी, खाद्यतेलांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर भाव अचानक वाढल्याने जनतेतील वाढता रोष लक्षात घेऊन राज्य सरकारने साठेबाजांवर धडक कारवाई करण्याचे आदेश पुरवठा विभागाला दिले आहेत. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये विभागाने धाडसत्र हाती घेतले. त्या स्थानिक तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली टाकल्या आहेत.
विशेष म्हणजे शहापूर तालुक्यात टाकलेल्या तीन धाडीत करोडोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामधील दोन धाडीत मसूरडाळ आणि एका धाडीत खाद्यतेलाचा समावेश आहे. अन्य तालुक्यांमध्ये टाकलेल्या
धाडीत अवैध साठा मिळून आलेला नाही.
आतापर्यंत तालुक्यातील ग्रामीण भागात ९३ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. तसेच तीन धाडींत करोडोंचा साठा जप्त केला असून अशा प्रकारे हे धाडसत्र सुरूच राहणार आहे.
- मोहन नळदकर, पुरवठा अधिकारी, जिल्हा ठाणे