बॉलिवूड कलाकारांसह अडीच हजार उच्चभ्रूंना बनावट विदेशी मद्याचा पुरवठा, चौघांना अटक
By जितेंद्र कालेकर | Published: March 20, 2024 06:25 PM2024-03-20T18:25:32+5:302024-03-20T18:26:29+5:30
बॉलिवूडचे कलाकार तसेच सेलिब्रेटींना बनावट विदेशी मद्याचा पुरवठा करणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय आयुक्त प्रदीप पवार यांना मिळाली होती.
ठाणे: बॉलिवूड कलाकार, सेलिबे्रटींसह तब्बल अडीच हजार उच्चभ्रूंना ऑनलाईन घरपोच बनावट विदेशी मद्याचा पुरवठा करणाऱ्या नशी बाभणीया (३८) याच्यासह चौघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने अटक केल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त प्रदीप पवार यांनी बुधवारी दिली. त्यांच्याकडून बनावट आयात विदेशी मद्याच्या तयार बाटल्या आणि आयात विदेशी मद्याच्या विविध ब्रॅन्डच्या रिकाम्या बाटल्या असा २७ लाख ७३ हजार ४०५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बॉलिवूडचे कलाकार तसेच सेलिब्रेटींना बनावट विदेशी मद्याचा पुरवठा करणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय आयुक्त प्रदीप पवार यांना मिळाली होती. त्याच आधारे १५ मार्च २०२४ रोजी उत्पादन शुल्क विभागाचे संचालक डॉ. विजय सूर्यवंशी, कोकण विभागीय ठाण्याचे उपायुक्त पवार आणि मुंबईचे अधीक्षक नितीन ष्घुले यांच्या मार्गदर्शनाखाली मद्य निरीक्षक दीपक शेवाळे, दुय्यम निरीक्षक राजेंद्र शिर्के, राजू वाष्घ, जवान सुनिल टोपले, अण्णा उडीयार आणि तेजस्वी मयेकर आदींच्या पकाने लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर ऑनलाईन द्वारे परदेशातील विदेशी मद्य (स्कॉच) विक्रीच्या उद्देशाने ष्घरपोच देण्यात येईल, अशा स्वरुपाच्या जाहिरातीची पडताळणी केली. त्यानुसार या पकाने जुहू तारा रोड, मालाड आणि ठाण्यातील मीरा रोड भागात सापळा रचून एका रिक्षामध्ये आलेल्या बनावट विदेशी मद्याच्या स्कॉचच्या विविध नामांकित कंपन्यांच्या २४ बाटल्या जप्त केल्या. यामध्ये नशी बाभणिया, भरत पटेल (५१), विजय यादव (४५) आणि दिलीप देसाई (६२) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत मालाड आणि मीरा रोड ये आयात विदेशी मद्य बनविण्याच्या कारखान्यावर छापा टाकला. या छाप्यामध्ये विविध ब्रॅन्डच्या बनावट आयात विदेशी मद्याच्या १२५ तयार बाटल्यांसह बाटल्यांमध्ये मद्य पॅकींगची सामुग्री आणि रिक्षा असा २७ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
बॉलिवूडच्या सेलिब्रेटींना बनावट मद्य
बॉलीवूडच्या सेलिब्रेटींसह अडीच हजार मद्यपींना ऑनलाईनद्वारे या आरोपींना बनावट विदेशी मद्य ऑनलाईन घरपोच पुरविल्याची माहिती तपासात समोर आली आहे. सोशल मिडियावर ऑनलाईनद्वारे मद्यविक्री, निर्मिती आणि वाहतूकीबाबत माहिती असल्यास १८००२३३९९९९९ या टोल फ्री क्रमांकावर आणि ८४२२००११३३ या व्हॉटसअॅप क्रमांकावर संपर्क साधावा.
प्रदीप पवार, उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कोकण विभाग, ठाणे.