शिवसेना उपजिल्हाप्रमुखाच्या आंदोलनाला पालकमंत्री, आमदाराचा पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 05:26 PM2017-12-14T17:26:33+5:302017-12-14T17:28:18+5:30
भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेत एकाच पदावर गेल्या १५ ते २० वर्षांपासून ठाण मांडणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची त्वरित बदली करून आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी बेकायदेशीर कारभाराला आळा घालावा, यासाठी ठाणे उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर यांनी उदयापासून बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
राजू काळे
भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेत एकाच पदावर गेल्या १५ ते २० वर्षांपासून ठाण मांडणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची त्वरित बदली करून आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी बेकायदेशीर कारभाराला आळा घालावा, यासाठी ठाणे उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर यांनी उदयापासून बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. त्याला पालकमंत्री एकनाथ शिंदे व आमदार प्रताप सरनाईक पाठिंबा दिल्याचे जाहीर करून सरनाईक यांनी त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची लेखी पत्राद्वारे मागणी आयुक्तांकडे केली आहे.
पालिकेत विविध विभागांतील अनेक अधिकारी एकाच पदावर गेल्या १५ ते २० वर्षांपासून कार्यरत असल्याने ते बेकायदेशीर कारभाराला खतपाणी घालीत आहेत, असे अधिकारी सत्ताधारी भाजपाचे सल्लागार होऊन आर्थिक वाटमारी करून त्यांना खूश करीत आहेत. त्यामुळे अनेक प्रस्ताव प्रशासनाची मान्यता नसतानाही सत्ताधारी त्या अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने परस्पर महासभेत मांडून आपले आर्थिक गणित जुळवित आहेत. अशा बेकायदेशीर प्रकारात ते अधिकारी जवळच्या कंत्राटदारांशी साटेलोटे करून भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप करीत त्या अधिकाऱ्यांची इतर विभागासह पदावर बदली करण्यात यावी, अशी लेखी मागणी उपजिल्हाप्रमुखांनी आयुक्तांकडे केली होती.
मात्र त्यावर कार्यवाही न केल्यास शुक्रवारपासून पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. प्रशासनाकडून ठोस कार्यवाही न झाल्याने उपजिल्हाप्रमुखांनी आंदोलन छेडण्यावर शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त लोकमतने १४ डिसेंबरच्या हॅलो ठाणे पुरवणीत प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पालकमंत्री एकनाथ शिंदे व आमदार प्रताप सरनाईक यांनी पाठिंबा आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. यात प्रामुख्याने सेनेचे पालकमंत्री असतानाही भाजपाच्या वर्चस्वाखातर त्यांच्यावर पालिका आयुक्तांना ठोस कारवाईच्या आदेशाखेरीज पाठिंबा देण्याची वेळ आल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे राज्याचे शिलेदार बनलेल्या भाजपाने सेनेची नाकेबंदीच केल्याचे स्पष्ट झाले आहे. आ. सरनाईक यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांना धाडलेल्या पत्रात सत्ताधारी भाजपाचे नेतृत्वाने पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीर कारभाराचे सल्ले देत असून तेच अर्थपूर्ण संबंध असलेल्या कंत्राटदारांना त्या नेतृत्वाला भेटण्याचा सल्ला देऊन आपली पोळी भाजतात. जे ठराव महासभेत मंजूर झाले आहेत, ते प्रशासनाच्या मान्यतेशिवाय परस्पर रद्द करण्याचा ठराव बेकायदेशीरपणे बहुमताच्या जोरावर मंजूर केला जातो. परिवहन सेवेच्या कंत्राटापासून ते नाट्यगृहाच्या विकासालाच सत्ताधा-यांनी त्या अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने खो घालण्यात आला आहे. तसेच विरोधी पक्षनेतेपदाचा वादही त्याच अधिकाऱ्यांच्या सुपीक डोक्यातून आल्याने सत्ताधाऱ्यांच्या कारभार त्या अधिकाऱ्यांप्रमाणे भ्रष्ट झाल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे.
मीरा-भार्इंदर महापालिकेत बेकायदेशीर कारभाराची दखल सरकारला सध्याच्या चालू अधिवेशनातच घेण्यास भाग पाडू.
- ठाणे जिल्हा, पालकमंत्री, एकनाथ शिंदे
सत्ताधाऱ्यांच्या तुघलकी काराभाराला पालिकेतील भ्रष्ट अधिकारी जबाबदार असुन तेच बेकायदेशीर कारभाराला खतपाणी घालीत आहेत. अशा अधिका-यांचे थेट निलंबन करून आयुक्तांनी त्यांच्या कारभाराची चौकशी सक्षम अधिकाऱ्यामार्फत करावी.
- प्रताप सरनाईक, आमदार