खोट्या पत्त्याद्वारे आधार, बँक खाते; मीरा रोडमधील घटना : यंत्रणेने नीट खातरजमा केलीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:35 AM2017-12-18T01:35:18+5:302017-12-18T01:35:51+5:30
दुस-याच व्यक्तीच्या पत्त्यावर एका व्यक्तीने स्वत:च्या वाहनचालक परवान्यापासून आधारकार्ड, रिक्षापरवाना तसेच बँकेत खाते उघडल्याचा प्रकार मीरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाला आहे. विशेष म्हणजे परवाना वा ओळखपत्र देताना एकाही यंत्रणेने पत्ता खरा आहे का, याची पडताळणी केली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भार्इंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही नुकताच बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार व पॅनकार्ड बनवून दिले जात असल्याचा प्रकार उघड झाला.
मीरा रोड : दुस-याच व्यक्तीच्या पत्त्यावर एका व्यक्तीने स्वत:च्या वाहनचालक परवान्यापासून आधारकार्ड, रिक्षापरवाना तसेच बँकेत खाते उघडल्याचा प्रकार मीरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाला आहे. विशेष म्हणजे परवाना वा ओळखपत्र देताना एकाही यंत्रणेने पत्ता खरा आहे का, याची पडताळणी केली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भार्इंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही नुकताच बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार व पॅनकार्ड बनवून दिले जात असल्याचा प्रकार उघड झाला.
मीरा रोडच्या कनकिया भागात पोलीस ठाण्याजवळ शिवम पॅलेस नावाची इमारत आहे. या इमारतीत राजबहादूर यादव राहतात. शनिवारी सकाळी त्यांच्या घरी टपाल घेऊन पोस्टमन आले. अपना बँकेचे एटीमएम त्यात असले, तरी ते खान मोहम्मद रशीद इलियास या नावाने होते. १२ वर्षांपासून कुटुंबीयांसह यादव येथे राहत असताना रशीद या भलत्याच व्यक्तीच्या नावाने त्यांच्या पत्त्यावर बँकेचे एटीएमकार्ड आल्याने यादव यांनी अपना बँकेची मीरा रोड शाखा गाठली.
बँकेच्या व्यवस्थापकाने रशीद याचे बँकेत खाते उघडण्यात आले असून त्यासाठी त्याने वाहनपरवाना व आधार ओळखपत्र दिल्याचे सांगितले. विशेष म्हणजे त्या दोन्हींवरही यादव यांच्याच घरचा पत्ता होता. पत्तापडताळणी वा सोसायटीचे पत्र, मेन्टेनन्स बिल आदी काहीच न घेता ‘तुम्ही खाते उघडले तरी कसे’ असे यादव यांनी बँक व्यवस्थापकास विचारले असता त्यांनी आमच्या नियमानुसार आधार ओळखपत्र पुरेसे असल्याचे सांगितले.
दरम्यान, बँक व्यवस्थापकाने रशीद याला भ्रमणध्वनीवर संपर्क साधून बँकेत बोलावून घेतले. रशीद याने मुंब्रा येथील वेलकम मोटार ट्रेनिंग स्कूल व दलालाच्या माध्यमातून ३२ हजार रुपये खर्च करून वाहनपरवाना काढून घेतला होता, असे सांगितले. मग, त्या परवान्याच्या आधारेच अन्य आधार, बँक खाते, रिक्षापरवाना आदी काढून घेतल्याचे त्याने कबूल केले.
बँक व्यवस्थापकाने याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यास नकार दिल्यावर यादव यांनीच रशीदला घेऊन पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांची भेट घेऊन सर्व घटना सांगत कारवाई करण्याची मागणी केली. पाडुळे यांच्या सांगण्यानुसार आपण लेखी तक्रार अर्ज पोलीस ठाण्यात दिला आहे.