आणीबाणीचे समर्थक हे देशातील लोकशाहीचे शत्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:27 AM2021-06-26T04:27:29+5:302021-06-26T04:27:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : इंदिरा गांधी सरकारविरोधातील जनआक्रोश दाबण्यासाठी, स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी, न्यायालयापेक्षा आपण मोठे आहोत आणि देशापेक्षाही ...

Supporters of the Emergency are the enemies of democracy in the country | आणीबाणीचे समर्थक हे देशातील लोकशाहीचे शत्रू

आणीबाणीचे समर्थक हे देशातील लोकशाहीचे शत्रू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : इंदिरा गांधी सरकारविरोधातील जनआक्रोश दाबण्यासाठी, स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी, न्यायालयापेक्षा आपण मोठे आहोत आणि देशापेक्षाही व्यक्ती आणि व्यक्तीची सत्ता मोठी या विचारांतून आणीबाणी लादली गेली. याकाळात प्रसारमाध्यमांची गळचेपी, दडपशाहीचे राजकारण झाले. सामाजिक संघटनांवरही बंदी घालण्यात आली. साडेचार लाख लोकांना अटक करण्यात आली, न्यायालयाचे पंख छाटण्यात आले. त्यामुळे २५ जून १९७५ला लादलेली आणीबाणी ही लोकशाहीसाठी काळी घटना असल्याचे मत आमदार पराग आळवणी यांनी व्यक्त केले.

भाजपतर्फे शुक्रवारी आणीबाणी काळा दिवस पाळण्यात आला. यानिमित्त कल्याण जिल्ह्यातर्फे शुक्रवारी झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले, जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली आणीबाणी विरोधात आंदोलनाने राष्ट्रीय स्वरूप घेतले. देशभरात विद्यार्थी, युवक, महिला, कामगार असे विविध घटक आंदोलनात सहभागी झाल्याने जनक्षोभ वाढला. देशातील लोकांचा मूळ स्वभाव हा लोकशाही मानणारा आहे. परंतु, इंदिराजींनी लोकांचा विरोध दाबून टाकायचा निर्णय घेतला. रातोरात २७ संघटनांवर बंदी घातली. विरोधी पक्षांच्या नेत्यांपासून, कार्यकर्त्यांचे अटकसत्र चालू झाले. एक लाख ३० हजार मीसा कायदा लावून अटक केली तर तीन लाख लोकांना विविध कायद्याखाली अटक केली.

प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांनीही कार्यक्रमाच्या निमित्ताने युवकांनी आणीबाणीचा काळ कसा होता याची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे संयोजक, भाजयुमो कल्याण जिल्हाध्यक्ष मिहीर देसाई यांनी प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन केले. भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी आमदार नरेंद्र पवार, आमदार गणपत गायकवाड, प्रदेश आणि जिल्हा कार्यालयमंत्री आशिष पावसकर तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पेन्शन केली रद्द

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या महाराष्ट्रातील सर्वांना पेन्शन योजना लागू केली होती. परंतु, ठाकरे सरकारने ती योजना बंद केली. याचा आम्ही निषेध करतो, असे आळवणी यावेळी म्हणाले.

----------------

Web Title: Supporters of the Emergency are the enemies of democracy in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.