भारत उद्योग कंपनीवरील नागरिकांच्या रोषामुळेच सुप्रीम कंपनीला मिळाले कंत्राट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:57 PM2019-08-31T23:57:46+5:302019-08-31T23:58:33+5:30
नागरिकांना होत आहे त्रास। मुदत संपून अडीच वर्षे झाली तरी कामे आजही अपूर्णच
भिवंडी : भिवंडीतील चिंचोटी-अंजूरफाटा ते माणकोली असे रस्ता रुंदीकरणाचे व टोलवसुलीचे काम बीओटी तत्त्वावर भारत उद्योग लिमिटेड या कंपनीने सुरुवातीस घेतले होते. मात्र, या कंपनीने रस्ता बनविण्याच्या कामात हलगर्जीपणा केल्यामुळे व नागरिकांच्या रस्त्याच्या नादुरु स्तीबाबत भारत उद्योग कंपनीवरील वाढत्या रोषाने कंत्राट सुप्रीम कंपनीला दिले. सध्या सुप्रीम कंपनीमार्फत रस्त्याची देखभाल दुरु स्ती व टोलवसुली करण्यात येत आहे. भारत उद्योग लिमिटेड कंपनीने रस्ता रुंदीकरण कामाला २८ आॅगस्ट २००९ पासून सुरु वात केली होती. हे काम पूर्ण करण्यासाठी सरकारने कंपनीला दोन वर्षे सहा महिन्यांचा कालावधी दिला होता. परंतु, ही अडीच वर्षांची मुदत पूर्ण होऊनही कंपनीने रस्त्याची आवश्यक असलेली बरीचशी कामे आजपर्यंत अपूर्ण ठेवलेली आहेत.
विशेष म्हणजे कामे अपूर्ण असूनही या कंपनीने १९ जानेवारी २०१२ पासून मोठ्या प्रमाणात टोल वसूल करण्यास सुरुवात केली आहे. तर, २८ फेब्रुवारी २०१२ रोजी कंपनीची रस्ता बनविण्याची सरकारी मुदत संपली आहे. ही मुदत संपली असूनही कंपनीने अजूनही बरीचशी महत्त्वाची कामे अपूर्ण ठेवली आहेत. पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्यरीतीने व्हावा, याकरिता आवश्यक असलेले ड्रेनेज वर्क , रस्त्यामध्ये असलेले विजेचे खांब, दुभाजक, वृक्षारोपण, साइन बोर्ड, गार्ड स्टोन, काँक्रिटीकरण, डांबरीकरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या रस्त्यामध्ये असलेल्या खारबाव येथील कामवारी नदीच्या पुलाचे काम हे आजही अपूर्ण आहे. त्याचबरोबर माणकोली-अंजूरफाटा मार्गावर अजूनही दुभाजकही लावलेले नाहीत. त्यामुळे या मार्गावर वाहतूककोंडी व अपघात होतात.
अपूर्ण कामे असूनही या कंपनीने १९ जानेवारी २०१२ पासून मोठ्या प्रमाणात टोल वसूल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर या कंपनीला टोल वसूल करण्याचे कंत्राट तब्बल २४ वर्षे तीन महिन्यांसाठी देण्यात आले आहे. परंतु, टोलवसुली सुरू केल्यापासून या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे कंपनीने केलेल्या या कामाच्या गुणवत्तेबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
एवढे होऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र कंपनीने केलेल्या कामाची गुणवत्ता योग्यच आहे व रस्त्याची ९८ टक्के कामे पूर्ण असल्याची खोटी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ कार्यालयास व राज्य सरकारला दिली. प्रशासन मात्र कंत्राटदाराविरोधात कुठलीची कारवाई करत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
अपघातात मृत पावलेल्यांना श्रद्धांजली
आंदोलनादरम्यान या महामार्गावरून प्रवास करताना अपघातात जीव गमावलेल्या मृत नागरिकांना आंदोलकांनी श्रद्धांजली वाहिली. तर, आंदोलनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तब्बल दोन ते तीन तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावर कोंडी झाली होती. चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.