सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश ठरवला रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:13 AM2021-03-13T05:13:16+5:302021-03-13T05:13:16+5:30

मीरा रोड : सर्वोच्च न्यायालयाने ७११ क्लब प्रकरणी आदेश रद्द ठरवला असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकारांना ...

Supreme Court quashes High Court order | सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश ठरवला रद्द

सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश ठरवला रद्द

Next

मीरा रोड : सर्वोच्च न्यायालयाने ७११ क्लब प्रकरणी आदेश रद्द ठरवला असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकारांना दिली. मुंबई उच्च न्यायालयात आम्हाला प्रतिवादी न करता न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. तो आदेश सर्वोच्च न्यायालयाने चुकीचा ठरवल्याचे मेहता म्हणाले.

मीरा रोडच्या ७११ क्लब व तारांकित हॉटेलप्रकरणी कांदळवन ऱ्हासाचे दाखल अनेक गुन्हे असताना महापालिकेने नियमात नसताना बांधकाम परवानगी दिल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या आहेत. एका याचिकेवर सप्टेंबर २०१९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करून तपास करावा, असे आदेश दिले होते. मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन स्थानिक पोलिसांकडे तपास दिला होता. परंतु स्थानिक तपास अधिकाऱ्याची मेहतांशी जवळीक असल्याने तपास नीट होत नसल्याचे आरोप तसेच तक्रारी होत होत्या. जानेवारी २०२१ मध्ये तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवल्याने अनेक तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले होते. तर आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास गेल्यानंतर मेहतांसह सेव्हन इलेव्हन हॉटेल्स कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मेहता यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले की, सप्टेंबर २०१९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने माझ्यासह सेव्हन इलेव्हन कंपनी व यांच्यावर मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आमच्याकडे सर्व परवानग्या असल्याने तसेच काही केले नसल्याने पोलीस तपासात काही निष्पन्न होणार नाही याचा आम्हाला विश्वास होता. परंतु आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास दिल्याचे कळल्यावर हे राजकीय दबावाखाली केले की व्यक्तिगत दबावाखाली हे समजले नाही. शेवटी आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जावे लागले, असे मेहता म्हणाले. सर्वोच्च न्यायालयानेही सांगितले की, आम्ही काही सांगत नाही की त्यात तथ्य नाही. पण तथ्य आहे तर परत न्यायालयात जा प्रतिवादी करा. मग दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर न्यायालयाने निर्णय द्यावा, असे मेहता म्हणाले. माझ्यावर २२ गुन्हे दाखल आहेत. पण त्यातील १५ गुन्हे पोलिसांनीच काही तथ्य नाही म्हणून निकाली काढले, अशी माहिती मेहतांनी दिली. या वेळी उपमहापौर हसमुख गेहलोत, सभागृह नेते प्रशांत दळवी, कंपनीचे संचालक प्रशांत केळुस्कर आदी उपस्थित होते. न्यायालयाच्या आदेशाने मेहता व त्यांचे समर्थक आनंद व्यक्त करत आहेत.

---------------------------------------------

न्यायालयाने क्लीन चिट दिलेली नाही

७११ क्लब प्रकरणातील एक तक्रारदार रोहित सुवर्णा म्हणाले की, न्यायालयाने मेहता वा संबंधितांना क्लीन चिट दिलेली नाही. जर मेहता म्हणतात की, त्यांनी काहीच चुकीचे केले नाही, मग ते चौकशीला घाबरले का? तपास होऊ द्यायचा होता, मग सत्य काय ते सर्वांसमोर आले असते.

Web Title: Supreme Court quashes High Court order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.