सुप्रीम कोर्टाने दहीहंडीवरील निर्बंध उठवले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:24 AM2017-08-02T02:24:39+5:302017-08-02T02:24:39+5:30
सुप्रीम कोर्टाने दहीहंडीवरचे सर्व निर्बंध उठवले असल्याचा दावा ठाण्यातील दहीहंडी समन्वय समितीने केला असून मानवी मनोरे रचून त्यांनी आपला आनंद साजरा केला.
ठाणे : सुप्रीम कोर्टाने दहीहंडीवरचे सर्व निर्बंध उठवले असल्याचा दावा ठाण्यातील दहीहंडी समन्वय समितीने केला असून मानवी मनोरे रचून त्यांनी आपला आनंद साजरा केला. मात्र सुप्रीम कोर्टाने दहीहंडीवरील निर्बंध उठवले असल्याला दुजोरा देणारा न्यायालयाचा आदेश अजून सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवरही उपलब्ध नाही.
हायकोर्टाने २०१४ साली दहीहंडीतील गोविंदाच्या वयाबाबत १८ वर्षांच्या वरील मर्यादेचे बंधन घातले. तसेच दहीहंडीची उंची २० फुटापर्यंतच असावी हेही निर्बंध घातले. त्यावेळी हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आणि उत्सव साजरा झाला. ही स्थगिती ५६ दिवसांची होती. त्यानंतर स्थगिती उठली आणि २०१५ व २०१६ साली या उत्सवावर हे निर्बंध कायम राहीले. याबाबत गेल्या दोन वर्षांपासून गोविंदा पथक नाराजी व्यक्त करीत होते. गेल्या वर्षी या दोन अटींविरोधात दहीहंडी समन्वय समिती आणि जय जवान गोविंदा पथकाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. यावर्षी तरी दहीहंडीवरचे निर्बंध उठावे यासाठी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील गोविंदा पथकांनी गणरायाला साकडेही घातले होते. १आॅगस्ट रोजी होणाºया सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे गोविंदा पथकांचे डोळे लागले होते.
दरम्यानच्या काळात गोविंदा पथकांनी सराव सुरू केला होता. मात्र त्याचा वेग मंदावला होता. मंगळवारी सुप्रीम कोर्टाने दहीहंडीवरील सर्व निर्बंध रद्द केले असून पुन्हा नव्याने हायकोर्टात सोमवार ७ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्यात सुरक्षितेतच्या उपाययोजनांबाबत राज्य शासनाने आपले म्हणणे मांडावयाचे आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय गोविंदांना दिलासा देणारा आहे म्हणून आम्ही सर्व गोविंदा पथकांनी याचा आनंद व्यक्त केला, असे महाराष्ट्र गोविंदा पथक समन्वय समितीचे सचिव समीर पेंढारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.