कल्याणच्या सुरेखा गावंडे यांची ‘कोळ्याची पोर’ अभ्यासक्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 03:02 AM2018-07-31T03:02:31+5:302018-07-31T03:02:53+5:30
समुद्रकाठचे नागरिक दैनंदिन जीवन जगताना सदैव आव्हानांना, संकटांना तोंड देत असतात. समुद्र हेच त्यांचे श्रद्धास्थान असते.
- जान्हवी मोर्ये
कल्याण : समुद्रकाठचे नागरिक दैनंदिन जीवन जगताना सदैव आव्हानांना, संकटांना तोंड देत असतात. समुद्र हेच त्यांचे श्रद्धास्थान असते. समुद्राकाठी राहणाऱ्या कोळी समाजातील मुली यादेखील अत्यंत साहसी असतात. ‘कोळ्याची पोर’ या कवितेतून सुरेखा गावंडे यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या त्यांच्या कवितेचा यंदाच्या वर्षी नवीन आठवीच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.
गावंडे या कल्याणच्या काटेमानिवली, हनुमाननगर परिसरात राहतात. त्या ३६ वर्षांपासून ठाणे येथे एमटीएनएलमध्ये नोकरी करत आहेत. वाचन फारसे नसले तरी रेल्वेतून प्रवास करताना त्या खिडकीतून बाहेरचे निरीक्षण करतात. त्यातूनच त्यांना कविता सुचतात. इयत्ता आठवीत असल्यापासूनच कविता लिहिण्यास सुरुवात केल्याचे त्या म्हणाल्या.
गावंडे म्हणाल्या, १९९३ मध्ये त्यांचे पहिले पुस्तक ‘सेजलची दंगल’ प्रसिद्ध झाले. त्यानंतर, एकेक साहित्य प्रसिद्ध होऊ लागले. त्यांचे काव्यवाचनाचे कार्यक्रम ‘आकाशवाणी’वर सातत्याने सुरू असतात. ‘आकाशवाणी’वर त्यांची पाच गाणी मुलांकडून गाऊन घेतली आहेत. ती गाणी ‘गंमतजंमत’मध्ये सुरू असतात. त्यांच्या निवृत्तीला अवघे एक वर्ष बाकी आहे. चित्रपटासाठी गीते लिहिण्याची त्यांची इच्छाही काही अंशी पूर्ण झाली आहे. एका आगामी चित्रपटासाठी नुकतीच त्यांनी तीन गाणी लिहिली आहेत. त्या तीन गाण्यांचे रेकार्डिंग झाले आहे. ‘सेजलची दंगल’ या पुस्तकासाठी कुसुमाग्रजांच्या शुभेच्छा त्यांना लाभल्या आहेत.
गावंडे यांचे पती केडीएमसीमध्ये आस्थापना विभागात कार्यरत होते. त्यांना एक मुलगी व मुलगा आहे. त्या एकत्रित कुटुंबात राहत आहेत. पाठ्यपुस्तकात कविता येण्यासाठी काही विशेष प्रयत्न केले नव्हते. फक्त कविता पुण्याला पाठवली होती. त्यानंतर त्यांची ‘कोळ्याची पोर’ कविता आठवीच्या अभ्यासक्रमासाठी निवडल्याचे फोनवरून कळवण्यात आले, असे त्यांनी सांगितले. कविता माध्यमिक शाळेच्या इयत्ता आठवीच्या वर्गासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लावली गेली आहे. याचा खूप आनंद गावंडे यांना झाला आहे.
- कल्याण येथील रहिवासी सुरेखा गावंडे यांच्या ‘सह्याद्रीची लेक हिमालयाच्या कुशीत’ या पुस्तकाला सृजन साहित्य पुरस्कार मिळाला आहे. ‘साक्षी’, ‘सांजवेळ’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. आतापर्यंत त्यांचे पाच काव्यसंग्रह, एक प्रवासवर्णन, ‘पहिला पाऊस, पहिले प्रेम’ हा मराठी गीतांचा अल्बम प्रकाशित झाला आहे. त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली आहे.