सुरेश द्वादशीवार यांच्या वक्तव्याचा अखिल भारतीय साहित्य परिषदेकडून निषेध
By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 13, 2022 04:58 PM2022-10-13T16:58:02+5:302022-10-13T17:20:46+5:30
Suresh Dwadashiwar: “ललित साहित्याचे बहुतांश लेखक हे उच्चवर्णीय होते त्यामुळे त्यांच्यावर सावरकरांच्या विचारांचा पगडा असल्याने ते गांधी विरोधी होते.” असे वक्तव्य केल्याने प्रा. सुरेश द्वादशीवार यांचा अखिल भारतीय साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत आहे.
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : “ललित साहित्याचे बहुतांश लेखक हे उच्चवर्णीय होते त्यामुळे त्यांच्यावर सावरकरांच्या विचारांचा पगडा असल्याने ते गांधी विरोधी होते.” असे वक्तव्य केल्याने प्रा. सुरेश द्वादशीवार यांचा अखिल भारतीय साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत आहे. तसे पत्र त्यांनी प्रसिद्ध केले आहे. अशी द्वेषमुलक भाषणे करणाऱ्या आणि तशीच मते असणाऱ्या माणसांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष केले जाऊ नये असे अखिल भारतीय साहित्य परिषदेचे स्पष्ट मत आहे असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
वर्धा येथे होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक द्वादशीवार, लेखक अच्युत गोडबोले आणि ज्येष्ठ कवी प्रा. प्रविण दवणे यांची नावे सुचविलेली आहेत. गोवा, फोंडा येथे शनिवार १५ बर ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत एकमताने अध्यक्षपदाची निवड होणार आहे. या अध्यक्षपदाच्या स्पर्धेत असणाऱ्या द्वादशीवार यांच्या वक्तव्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपल्यातील जात धर्म यांचे भेदाभेद मिटवून आपण एकत्र आले पाहिजे असा लोकांना उपदेश करणारे द्वादशीवार यांनी स्वतःच्या भाषणात मात्र भेदभावाला खतपाणीच घातले आहे. मराठीतील बहुतांश ललित लेखक हे ब्राह्मण होते, ललित साहित्याचे बहुतांश लेखक हे उच्चवर्णीय होते. त्यामुळे त्यांच्यावर सावरकरांच्या विचारांचा पगडा असल्याने ते गांधी विरोधी होते आणि त्यांनी महात्मा गांधींना न्याय दिला नाही असे वर्णभेद निर्माण करणारे, भावना भडकावून दुही माजवणारे विखारी भाषण त्यांनी केले.
दक्षिणायन महाराष्ट्र या संस्थेच्या नागपूर येथील कार्यक्रमात ते बोलत होते असे अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. नरेंद्र पाठक यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. आपल्या भाषणात खांडेकर ते प्र.के. अत्रे यांच्यापर्यंत अनेकांची निंदा करत त्यांनी न्यायालयांवरही टीका केली. न्यायालये सुद्धा सध्या स्वच्छ राहिली नाहीत, हिंदू मताची झाली आहेत असे म्हणत अत्यंत अवमानकारक भाषण केले. अशी भाषणे करून समाजातील भेदांना उत्तेजन देणाऱ्या विषारी प्रवृत्तीचा अखिल भारतीय साहित्य परिषद तीव्र निषेध करत आहे असे पाठक म्हणाले. साहित्याच्या उद्देश समाज तोडणे नसून समाज जोडणे आहे हे विसरून चालणार नाही. साहित्य संमेलनाचा अध्यक्षच जर भेदाला उत्तेजन देणारा असेल तर ते साहित्य संमेलन समाजाला कोणती दिशा दाखवणारे असेल? असा सवाल पाठक यांनी परिषदेच्यावतीने उपस्थित केला आहे.