सुरेश टावरेंच्या उमेदवारीमुळे होती काँग्रेसमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 01:12 AM2019-05-26T01:12:42+5:302019-05-26T01:14:46+5:30

भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्यावेळी भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला.

Suresh Taware's candidacy was due to Congress's resentment | सुरेश टावरेंच्या उमेदवारीमुळे होती काँग्रेसमध्ये नाराजी

सुरेश टावरेंच्या उमेदवारीमुळे होती काँग्रेसमध्ये नाराजी

googlenewsNext

- पंढरीनाथ कुंभार
भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्यावेळी भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला. त्यानंतर, झालेल्या पहिल्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे अबू आसीम आझमी निवडून आले होते. परंतु, ते मुंबईतील गोवंडी येथे निवडून आल्याने त्यांनी या जागेचा राजीनामा दिला. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत आझमी यांचा मुलगा फरहान आझमी यांनी निवडणूक लढवली. त्यावेळी भाजप-सेना युतीचे उमेदवार रूपेश म्हात्रे निवडून आले. त्यानंतर, २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत सेना व भाजप युती नव्हती. तरीही, शिवसेनेचे म्हात्रे भाजप व समाजवादी पक्षाच्या उमेदवारास पराभूत करून निवडून आले. त्यामुळे या विधानसभा क्षेत्रातून समाजवादीचे उमेदवार डॉ. नुरूद्दीन अन्सारी यांना चांगली मते मिळणे अपेक्षित होते. परंतु, त्यांना केवळ ६८५ मते मिळाली. यावरून भिवंडी पूर्व मतदारसंघातील समाजवादी पक्षाचा प्रभाव संपुष्टात आला, असे अनुमान काढता येईल.
समाजवादीला मिळणारी मतेही अपेक्षेप्रमाणे काँग्रेसला मिळालेली नाहीत. याचे कारण म्हणजे काँग्रेसचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचले नाहीत. भिवंडी लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिल्याने नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली होती. त्यांनी बंडखोरी केली होती. त्याचप्रमाणे काँग्रेस शहराध्यक्ष शोएब गुड्डू यांनीही या वस्तुस्थितीकडे फारसे लक्ष न देता त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला नाही. मतदारसंघात काँग्रेसने सेलिब्रेटींच्या सभा घेतल्या नाहीत. परिणामी, काँग्रेसचा प्रचार मतदारांपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे या मतदारसंघातील मतदान कपिल पाटील यांना मिळालेल्या मतांपेक्षा २३ हजारांनी वाढलेले दिसले, तरी अपेक्षेप्रमाणे ते कमी झाल्याचे दिसून येते. त्याउलट, या मतदारसंघातील मतदान मिळवण्यासाठी पाटील व सेनेचे म्हात्रे यांनी चांगलेच प्रयत्न केले. येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमदार म्हात्रे यांनी आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पाटील यांना ४७,०१८ मते मिळाली. तर, वंचित आघाडीचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत न पोहोचल्याने ३८०३ मतांवर समाधान मानावे लागले.
>विधानसभेला काँग्रेसला
यश मिळणे कठीण
लोकसभा निवडणुकीत उमेदवार कपिल पाटील यांच्याविरोधात शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने बंड पुकारले. त्याचा परिणाम होऊ न देता शिवसेनेचे आमदार व नगरसेवकांनी या मतदारसंघात चांगले काम केले. त्याप्रमाणे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही मते मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे ही जागा पुढील निवडणुकीत युतीकडे राहण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. एकूणच काँग्रेसला या मतदारसंघात कितपत यश मिळेल, हे काळच ठरवणार आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजी शमणे अत्यंत गरजेचे आहे.
>की फॅक्टर काय ठरला?
काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना पक्षातील गटाचा विरोध असताना त्यांनी विश्वासातील कार्यकर्त्यांना हाताशी धरून मते मिळवली.
शिवसेना आमदार रूपेश म्हात्रे यांनी विधानसभेची संधी पुन्हा मिळवण्यासाठी भाजप उमेदवार कपिल पाटील यांचे काम करत युतीधर्म टिकवला.
या मतदारसंघातील काही काँग्रेस नगरसेवक व नाराज गटांनी काम न केल्याने भाजप उमेदवाराला अपेक्षेपेक्षा लीड कमी मिळाले.

Web Title: Suresh Taware's candidacy was due to Congress's resentment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.