सुरजला व्हायचेय सनदी अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:10 AM2019-12-29T00:10:33+5:302019-12-29T00:10:38+5:30

समतोल फाउंडेशनकडून पळून आलेल्या सात मुलांची घरवापसी

Surjit wants to be a chartered officer | सुरजला व्हायचेय सनदी अधिकारी

सुरजला व्हायचेय सनदी अधिकारी

Next

ठाणे : कर्नाटकातील बेल्लारी गावातील नऊ वर्षांचा सुरज थोटे घर सोडून आला आणि चुकीच्या ट्रेनमध्ये बसला. मी मुंबईत आलो, बाहेर फिरत असताना ‘समतोल’चे कार्यकर्ते मला भेटले. त्यांनी मला लातूरला शिकायला पाठविले. मग मला बालस्नेहालयात पाठविण्यात आले. आधी मला फक्त कन्नड येत होती. इथे आल्यावर मी हिंदी, मराठी या दोन्ही भाषा शिकलो. मला ठाणे महापालिकेच्या शाळेत आठवीला असताना आदर्श विद्यार्थी म्हणून गौरविण्यात आले. आता ब्राह्मण विद्यालयात शिकत असून मला आयएएस व्हायचे आहे, असे थोटे याने सांगताच प्रेक्षकांनी सुरजकरिता टाळ्यांचा कडकडाट करीत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

कुणी घरातले रागवल्याने, कुणी कामाच्या शोधात तर कुणी शिकायचे म्हणून अशा विविध कारणांनी घरातून निघून आलेल्या मुलांना शनिवारी त्यांच्या पालकांकडे हस्तांतरित करण्यात आले. काही महिने किंवा वर्ष घरापासून दूर राहिलेली ही मुले आपल्या आईला, बहिणीला, आजीला घट्ट मिठी मारून ढसाढसा रडत होती. आमचे हरवलेले मूल आम्हाला सुखरूप मिळाले, या भावनेने त्यांच्या पालकांच्या डोळ्यांतूनही आनंदाश्रू झरत होते.

समतोल फाउंडेशन आणि स्ट्रीट चिल्ड्रन फाउंडेशन आयोजित मन:परिवर्तन शिबिर समारोप कार्यक्रम शनिवारी मराठी ग्रंथसंग्रहालय येथे झाला. रेल्वेस्थानकावर भटकत असलेल्या या मुलांचे आज त्यांच्या कुटुंबात पुनर्वसन करण्यात आले. सात मुलांना शनिवारी त्यांच्या पालकांसोबत घरी पाठविले. आईवडील नसलेला आणि आजी सांभाळ करीत असलेला जालन्याचा अमोल कमाणे म्हणाला की, विहिरीत उडी मारली म्हणून भावाने मारल्याचा राग मनात धरून मी घर सोडले. मला माझी चूक उमजली. आता मी माझ्या आजीला सोडून जाणार नाही, असे सांगत त्याने आपल्या आजीला घट्ट मिठी मारली. कल्याण, म्हारळचा युवराज गोरे म्हणाला की, मला घरात मारले म्हणून घरातून पळून आलो होतो. मात्र, ती माझी चूक होती. कसारा, पाटीलवाडीतील करण वीर म्हणाला की, माझे वडील गवंडी काम करतात. मी त्यांच्यासोबत काम करावे, ही त्यांची इच्छा असली तरी मला शाळा शिकायची होती. कामाच्या शोधात मुंबईकडे धाव घेतली. आता घरी जाऊन शिकणार असल्याचे तो म्हणाला.

आपल्याला अनेकदा प्रवासात, रस्त्यात, स्टेशनवर अनेक लहान मुले दिसतात. मात्र, ती कोणाची तरी मुले असतात, ही बाब लक्षात घेऊन या मुलांविषयी संवेदनशील होण्याची गरज आहे, असे मत राज्य बालआयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी व्यक्त केले. मुले ही राष्ट्रीय संपत्ती असून, ते चुकीच्या मार्गाकडे वळू नये, याकरिता त्यांना दिशा देण्याचे काम समतोल फाउंडेशन करीत आहे. आजकाल पालक आणि मुलांचा संवाद होत नाही. शिक्षणासोबत संस्कार होणे आवश्यक असते. त्यामुळे या मुलांवर संस्कार करण्याचे काम समतोल करत असल्याचे आ. संजय केळकर यांनी सांगितले. ‘स्लम डॉग मिलेनिअर’ या चित्रपटाचे साउंड डायरेक्टर रेसुल पुकुट्टी म्हणाले की, मुले घर सोडून येतात, त्याचे कारण त्या मुलांमध्ये नसून आपल्यात, समाजात आहे. आपण त्यांच्यासाठी चांगले वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे म्हणाले की, ठाण्यात अनेक श्रीमंत सोसायट्या आहेत, त्या सहज पैसे खर्च करतात. परंतु, समतोलच्या कामाला पैशांची अत्यंत गरज असून या श्रीमंतांनी आपल्या काळजाचा कोपरा या मुलांसाठी ठेवावा. यावेळी त्यांनी ग.दि. माडगूळकर यांचे ‘एक धागा सुखाचा’ हे गीत सादर केले. दरम्यान, दृष्टिहीन मुलांच्या वाद्यवृंदाचा संगीतमय कार्यक्रम झाला. यावेळी ‘समतोल’चे संस्थापक विजय जाधव, विश्वस्त एस. हरिहरन, संकल्प शाळेचे संचालक राज परब, शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. ज्योती परब, साक्षी परब उपस्थित होते.

समतोल फाउंडेशन आणि आरती नेमाणे हे या मुलांच्या कहाण्या ‘लोकमत’ या वृत्तपत्रातून लिहीत असून त्यांचे लवकरच पुस्तक प्रकाशित करण्यात येणार असल्याचे व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड यांनी जाहीर केले. आज ‘हरवलेलं मुक्काम पोस्ट’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले.

Web Title: Surjit wants to be a chartered officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.