ठाणे शहरात ‘सरप्राइज नाकाबंदी’, बीट मार्शलसह कोणत्याही वेळी पेट्रोलिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:06 AM2017-09-25T00:06:26+5:302017-09-25T00:06:34+5:30
वाढत्या चो-या आणि छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी ठाणे शहर आयुक्तालयातील वागळे इस्टेट परिमंडळामध्ये ‘सरप्राइज पेट्रोलिंग’ सुरू केले आहे.
जितेंद्र कालेकर
ठाणे : वाढत्या चो-या आणि छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी ठाणे शहर आयुक्तालयातील वागळे इस्टेट परिमंडळामध्ये ‘सरप्राइज पेट्रोलिंग’ सुरू केले आहे. बीट मार्शलच्या गस्तीबरोबर ‘सरप्राइज नाकाबंदी’ही सुरू झाल्याने गुन्हेगारांवर वचक राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी ‘लोकमत’ला दिली.
एकीकडे नवरात्रोत्सवानिमित्त रात्री बाहेर पडणारा महिलावर्ग, तर दुसरीकडे नोकरी, व्यवसायानिमित्त कामावर असलेली पुरुष मंडळी. या दोन्हींचा गैरफायदा घेत चोरट्यांनी वागळे इस्टेटमधील किसननगर, वर्तकनगरमधील लोकमान्यनगर, रामचंद्रनगर तसेच कापूरबावडी, चितळसर आणि कासारवडवली या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील घोडबंदर रोड, मानपाडा, वसंतविहार, शिवाईनगर, बाळकुम आदी परिसरांत रात्री मोर्चा वळवल्याने चोºयांचे प्रमाण वाढले आहे. लोकमान्यनगर येथे तर दोन दिवसांपूर्वी रात्री घराची कडी काढून घरात शिरलेल्या चोरट्याने गुंगीच्या औषधाचा स्प्रे मारून अडीच लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला.
वरील दोन्ही घटनांमधील चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून वर्तकनगर आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटकडून याबाबतचा तपास सुरू आहे. सायंकाळी किंवा सकाळी फेरफटका मारणाºया महिलांची मंगळसूत्र तसेच सोनसाखळी हिसकावण्याच्या घटनांमध्येही पुन्हा वाढ झाली आहे. नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी काही टवाळखोर तरुणांकडून दांडियाच्या निमित्ताने तरुणींची छेड काढण्याचेही प्रकार घडतात. या सर्वच पार्श्वभूमीवर वागळे विभागातील वर्तकनगर, वागळे इस्टेट, कापूरबावडी, चितळसर, श्रीनगर, कासारवडवली येथे सरप्राइज पेट्रोलिंग सुरू केली आहे.