केजरीवाल यांच्या मागणीचे आश्चर्य वाटले, आमदार राजू पाटील म्हणाले...
By प्रशांत माने | Published: October 27, 2022 09:58 PM2022-10-27T21:58:07+5:302022-10-27T21:59:34+5:30
...पण ते असे भावनिक राजकारण करायला लागले याचे वाईट वाटते.
डोंबिवली - नोटांवरील फोटोंवरुन एकीकडे राजकारण शिगेला पोहोचले असताना, दुसरीकडे केजरीवालांनी केलेल्या मागणीचे आश्चर्य वाटले. जो माणूस एवढे चांगले काम करतो त्याला चांगले बोलायला काही हरकत नाही. शाळांचा चांगला कायापालट त्यांनी दिल्लीत केला आहे. पण ते असे भावनिक राजकारण करायला लागले याचे वाईट वाटते असे मत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले आहे.
नोटांवर फोटो कोणाचा असावा यावरून राजकारण रंगले असताना आमदार पाटील यांनी सकाळी ट्विट करून आपले परखड मत मांडले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले आपल्या देशात, राज्यात इंधनाच्या किंमती ज्या वाढल्या आहेत. त्याचा एकत्रित परिणाम सर्व गोष्टींवर होतो सर्व गोष्टी महाग होत चालल्यात बळीराजावर पावसाची अवकृपा झाली आहे. शेतकरी सुखी नाहीये, आपल्याकडे रस्ते चांगले नाही, आरोग्यवस्था चांगली नाही आणि अशा वेळी आपण कशावर भांडतो आणि राजकारण करतो तर नोटांवर फोटो कोणता पाहिजे. लोक त्रासले आहेत, लोक बोलतात त्यांच्या भावना काय समोर येतात त्याच्याकडे कोणाचे लक्ष नाही आहे. एवढे असंवेदनशील होऊन, असे राजकारण सध्या चालू आहे. असे राजकारण होऊ नये. कुठेतरी वाईट वाटले म्हणून ते ट्विट केल्याकडेही आमदार पाटील यांनी लक्ष वेधले.