ठाण्यात शिवजयंती विशेष संगीत कट्ट्यावर सुरवीरांचा मानाचा मुजरा 'दैवत छत्रपती'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 04:32 PM2019-03-23T16:32:34+5:302019-03-23T16:34:34+5:30

शिवजयंती विशेष संगीत कट्ट्यावर संगीत कट्ट्याच्या सुरवीरांनी महाराजांच्या पवित्र स्मृतीस आपल्या गीतांच्या सादरीकरणाने मानाचा मुजरा अर्पण केला.

Surveer's special mujra 'Shiv Chhatrapati Shivaji Jayanti' in Thane | ठाण्यात शिवजयंती विशेष संगीत कट्ट्यावर सुरवीरांचा मानाचा मुजरा 'दैवत छत्रपती'

ठाण्यात शिवजयंती विशेष संगीत कट्ट्यावर सुरवीरांचा मानाचा मुजरा 'दैवत छत्रपती'

googlenewsNext
ठळक मुद्देशिवजयंती विशेष संगीत कट्ट्यावर सुरवीरांचा मानाचा मुजरा 'दैवत छत्रपती' अफझलखान वधाचा पोवाडा पहाडी आवाजात सादरअरविंद जगताप लिखित 'शिवरायांस पत्र' केले सादर

ठाणे : मराठी अस्मितेचा मानबिंदू  जाणता राजा शिवछत्रपती त्यांच्या कीर्तीचे पराक्रमाचे गुणगान करणाऱ्या गीतांचे स्फूर्तिदायक सादरीकरण म्हणजे 'दैवत छत्रपती' .शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला संगीत कट्ट्यावर सुरांनी शिवस्तुतीसुमनांची उधळण  करून वातावरण शिवमय झाले होते. शिवरायांचे विचार त्यांचे अस्तित्व कुठेतरी पुसत होताना दिसत आहेत फक्त  महाराजांसारखी दाढी, कपाळी चंद्रकोर टीशर्ट  गाड्यांवर त्यांची छायाचित्र इतकेच शिवराय उरलेत का हि शंका येत असताना कुठेतरी शिवरायांचे पोवाडे स्तुतिगीते ह्यांचं सादरीकरण म्हणजे महाराजांच्या शिवजयंतीचा खरा जल्लोष   म्हणूनच  अभिनय कट्टा आणि संगीत कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष  किरण नाकती हयांच्या  संकल्पनेतून संगीत कट्ट्यावर 'दैवत छत्रपती' ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

   कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिकृतीस पुष्पहार अर्पून करण्यात आली. प्रथेप्रमाणे ज्येष्ठ प्रेक्षक प्रतिनिधी शरद भालेराव ह्यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून संगीत कट्ट्याची सुरुवात करण्यात आली. सुरुवातील अभिनय कट्ट्याचे कलाकार राजन मयेकर ह्यांनी शिवरायांना अभिवादन करणारी नांदी सादर  केली. त्यांनतर संगीत कट्ट्याचे कलाकार हरीष  सुतार ह्याने 'दैवत छत्रपती' ह्या गीताचे सादरीकरण करून कार्यक्रमाची सुंदर सुरुवात केली. त्यांनतर सुरेश राजगुरू ह्यांनी 'शूर आम्ही सरदार' गीताचे सादरीकरण केले.निशा पांचाळ ह्यांनी 'ऐरणीच्या देवा' ह्या गीताचे सुरेल सादरीकरण केले. किरण म्हापसेकर ह्यांनी 'देहाची तिजोरी' ह्या गीतांचे सादरीकरण केले. विनोद पवार ह्यांनी 'आकाशी झेप घे रे पाखरा'  ह्या गीताचे सादरीकरण केले.निशा पांचाळ आणि किरण म्हापसेकर ह्यांनी मी डोलकर ह्या गीताचे सादरीकरण करुन कोळी संस्कृतीची सुरमयी झलक सादर केली.त्यांनतर  हरीष  सुतार ह्यांनी अफझलखान वधाचा पोवाडा पहाडी आवाजात सादर केला.शुभांगी भालेकर ह्यांनी अरविंद जगताप लिखित 'शिवरायांस पत्र' सादर केले.  

         सीमेवर लढणारा प्रत्येक सैनिक शिवबा असतो आणि त्या सैनिकांची आई जिजाऊ असते अशा सैनिकांना अशा सर्व शिवबांना मानाचा मूजरा करणे आपले आद्य कर्तव्य आहे असे मत किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले .संगीत कट्ट्याचे कलाकार विनोद पवार ह्यांनी 'कर चले हम फिदा' आणि निशा पांचाळ ह्यांनी ये 'मेरे वतन  के लोगो ' ह्या गीतांच्या सादरीकरणातून सीमेवरील सैनिकांना मानाचा मुजरा केला. ज्येष्ठ प्रेक्षक शरद भालेराव ह्यांनी 'दादला नको ग बाई' वर श्रोत्यांना ताल धरायला लावला. तेजराव पांडागळे ह्यांनी 'आवो बच्चो तुम्हे दिखाऊ' आणि 'जय जय महाराष्ट्र माझा' ह्या गीतांचे बासरीवर सुरेल सादरीकरण केले तर दामिनी पाटील ह्यांनी 'वेडात वीर दौडले सात' ह्या गीताचे सेक्सोफोनवर सादरीकरण करून वातावरण मंत्रमुग्ध केले. 

    कार्यक्रमच्या शेवटी  अभिनय कट्टा बालसंस्कार शास्त्राच्या विध्यार्थ्यानी 'अफजलखान वध' पोवाड्याचे रंगमंचीय सादरीकरण केले. सादर सादरीकरणात प्रथम नाईक, अद्वैत मापगांवकर ,श्रेयस साळुंखे , अमोघ डाके ,चिन्मय मौर्ये ,रोहित कोळी,स्वरांगी मोरे, वैष्णवी चेऊलकर , अस्मि शिंदे, रुचिता भालेराव ह्या बालकलाकारांनी सहभाग घेतला. सदर सादरीकरणाचे दिग्दर्शन अभिनय कट्ट्याचा कलाकार परेश दळवी ह्याने केले. बालकलाकारांनी साकारलेला अफजलखान वधाचा प्रसंग उपस्थितांच्या  डोळ्यांचे पारणे फेडून गेला.

  शिवरायांच्या विचारांचा वारसा एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे पोहचवणे हि आपली जबाबदारी आहे.त्यासाठीच शिवजयंतीचे औचित्य साधून  वाचक कट्ट्यावर अभिवाचनातून 'जाणता राजा'  आणि संगीत कट्ट्यावर शिवमय सुरांनी भारलेले 'दैवत छत्रपती' ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालशिवाजी ते शिवछत्रपती हा प्रवास प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात असतो आणि तो करणे प्रत्येकाची गरज आहे. आणि तो करण्यासाठी शिवराय जाणून घेणे गरजेचं आहे.प्रत्येकाने आपापल्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावर क्षेत्रातील शिवाजी बनण्याचा प्रयत्न करूया असे आवाहन किरण नाकती ह्यांनी उपस्थित कलाकार आणि श्रोत्यांना केले. सदर कार्यक्रमाचे निवेदन राजन मयेकर ह्यांनी केले.

Web Title: Surveer's special mujra 'Shiv Chhatrapati Shivaji Jayanti' in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.