फेरीवाल्यांना आयुक्त शरण? वस्तू खरेदी न करण्याचे आवाहन : संयुक्त कारवाईचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 03:01 AM2017-09-09T03:01:40+5:302017-09-09T03:01:44+5:30
रेल्वेस्थानक परिसर असो अथवा स्कायवॉक, यावरील फेरीवाले हटवण्यात केडीएमसी प्रशासन पुरते हतबल ठरले असताना आता नागरिकांनी फेरीवाल्यांकडून वस्तू खरेदी करू नये, असे आवाहन आयुक्त पी. वेलरासू यांनी केले आहे.
कल्याण : रेल्वेस्थानक परिसर असो अथवा स्कायवॉक, यावरील फेरीवाले हटवण्यात केडीएमसी प्रशासन पुरते हतबल ठरले असताना आता नागरिकांनी फेरीवाल्यांकडून वस्तू खरेदी करू नये, असे आवाहन आयुक्त पी. वेलरासू यांनी केले आहे. आयुक्तांचे हे आवाहन पाहता फेरीवाला अतिक्रमणापुढे त्यांनी शरणागती पत्करली का, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.
केडीएमसी मुख्यालयात शुक्रवारी नगर पथ समितीची बैठक झाली. या वेळी वेलरासू यांच्यासह महापालिका आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कल्याण रेल्वेस्थानक परिसरातील स्कायवॉकची स्वच्छता दर १५ दिवसांनी करण्याचे आदेश प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि अग्निशमन विभाग यांनी समन्वय साधून करण्याचे आदेश वेलरासू यांनी दिले.
नवरात्रोत्सवापूर्वी महापालिका व पोलिसांमार्फत फेरीवाल्यांवर संयुक्त कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचनाही या वेळी करण्यात आल्या. विशेष म्हणजे रस्ते, पदपथ व स्कायवॉक मोकळा राहण्याच्या दृष्टीने नागरिकांनीही स्कायवॉकवरील फेरीवाल्यांकडून वस्तू खरेदी करू नये, असे आवाहन वेलरासू यांनी केल्याने प्रशासनाची हतबलता समोर आली आहे.
फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा मुद्दा गंभीर आहे. फेरीवाल्यांविरोधात कारवाईचे आदेश याआधीही आयुक्तांनी अनेकदा दिले आहेत. परंतु, काडीमात्र फरक पडलेला नाही. कल्याण-डोंबिवलीतील स्कायवॉकही ‘मिनी शॉपिंग मॉल’ झाले आहेत. आता पुन्हा आयुक्तांनी संयुक्त मोहीम उघडण्याचे आदेश देत नागरिकांनाच वस्तू खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. ही मोहीम केवळ आदेशापुरतीच मर्यादित राहते की, त्याचे ठोस कारवाईत रूपांतर होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.