उल्हासनगरातील फटाक्याच्या दुकानांचे सर्वेक्षण; परवान्यांचे नूतनीकरण न करणाऱ्या ४ दुकानावर २ लाखाची दंडात्मक कारवाई
By सदानंद नाईक | Published: November 3, 2023 05:57 PM2023-11-03T17:57:25+5:302023-11-03T17:59:01+5:30
उल्हासनगरात जिल्हातील सर्वात मोठी फटाक्यांची बाजारपेठ असून जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून व्यापारी व नागरिक फटाके खरेदी करण्यासाठी गर्दी करतात.
उल्हासनगर : दिवाळीच्या सणा दरम्यान कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून अग्निशमन विभागाकडून शहरातील ३६ पैकी १५ फटाक्याच्या दुकाने सर्वेक्षण केले. १५ पैकी ४ दुकानदारांनी परवान्यांचे नूतनीकरण केले नसल्याने, त्यांच्यावर २ लाखाचा दंड वसूल केल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.
उल्हासनगरात जिल्हातील सर्वात मोठी फटाक्यांची बाजारपेठ असून जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून व्यापारी व नागरिक फटाके खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. बहुतांश दुकाने शासनाचे सर्व नियम डावलून रहिवासी व मार्केट परिसरात असून दुकानदारांना दिवाळी सणात विशेष काळजी घ्यावी लागते. शहरात परवाने असलेले एकून ३६ दुकाने फटाक्याची असून शासन, पोलीस व महापालिकेच्या नियमाला डावलून कित्येक पट फटाक्याचा साठा दुकानदार ठेवूनही दरवर्षी कारवाई होत नाही. मात्र यावर्षी दिवाळीपूर्वी फटाक्याच्या दुकानाची झाडाझडती महापालिका अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी घेणे सुरू केले. शुक्रवारी ३६ पैकी १५ दुकानाचे सर्वेक्षण केलेअसता, ४ दुकानदारांनी परवान्यांचे नूतनीकरण केले नसल्याचे उघड झाले. या दुकानावर प्रत्येकी ५० हजार असे एकून २ लाखाचा दंड आकाराला आहे. तर अन्य दुकानदाराने सर्वेक्षण बाकी आहे.
महापालिकेने दिवाळी सणा दरम्यान गोलमैदानात ८ तर दसरा मैदानात १२ असे एकून २० फटाक्याच्या दुकानांना एका आठवड्यासाठी तात्पुरती मंजुरी दिली. फटाक्याच्या मंजुरी वेळी मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. तर शहरातील फटाक्याचे दुकान व त्यांच्या गोदामा मध्ये फटाक्याच्या साठ्याचे सर्वेक्षण कधी? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते विचारीत आहेत. शहरातील राहिवासीं व मुख्य मार्केट मध्ये फटाक्यांची दुकाने असल्याने, शहर फटाक्याच्या बारुदवर वसल्याची टीका होत आहे. पोलीस व महापालिका प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून फटाक्यांची दुकाने रात्रभर सुरू असल्याचे चित्र शहरात असून यावर्षी तरी महापालिका व पोलीस कारवाई करणार का? असा प्रश्न निर्माण झाला.