ग्रामीण भागात एक लाख ८६ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण; जिल्हा परिषदेची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 12:25 AM2021-03-27T00:25:49+5:302021-03-27T00:30:34+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न
ठाणे : दोन ते तीन महिन्यांपासून ग्रामीण भागात आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात आजही रुग्णांची संख्या आटोक्यात आहे. असे असले तरी, ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता जिल्हा आरोग्य विभागाने विविध उपाययोजना आखण्यास सुरुवात केली असून, रुग्ण सापडलेल्या ठिकाणाचा परिसर कंटेन्टमेंट झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे. या क्षेत्रात ४१९ सर्वेक्षण पथकांच्या माध्यमातून आतापर्यंत एक लाख ८६ हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. ग्रामीण भागात या आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्यात सध्याच्या घडीला मुरबाड, अंबरनाथ, शहापूर, कल्याण, भिवंडी या ग्रामीण भागात आतापर्यंत २० हजार ६६० जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत १९ हजार ३२४ जणांनी कोरोनावर मात केली असली तरी, या आजाराने ६०५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सध्या ७३१ जण विविध रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे काम ग्रामपंचायतनिहाय केले जात आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. मनिष रेंघे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य अधिकारी आणि विविध कर्मचारी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुरबाड, अंबरनाथ, शहापूर, कल्याण, भिवंडी तालुक्यात कार्यरत आहेत. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी आरोग्याच्या कर्मचाऱ्यांसह, महिला व बालविकास विभागाच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ती अशा एकूण ४१९ सर्वेक्षण पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम सुरू असून, आतापर्यंत एक लाख ८६ हजार ४६० नागरिकांचे सर्वेक्षण केल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.