ठाण्यातील सर्व्हेत ८८८ खड्डे
By Admin | Published: July 14, 2016 01:44 AM2016-07-14T01:44:18+5:302016-07-14T01:44:18+5:30
यंदा पावसाळ्यात खड्डे पडणार नसल्याचा दावा पालिकेने केला असला तरी पावसाने त्यांचा दावा फोल ठरवला आहे. महापालिकेने केलेल्या सर्व्हेत शहरात आजघडीला ८८८ खड्डे असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे : यंदा पावसाळ्यात खड्डे पडणार नसल्याचा दावा पालिकेने केला असला तरी पावसाने त्यांचा दावा फोल ठरवला आहे. महापालिकेने केलेल्या सर्व्हेत शहरात आजघडीला ८८८ खड्डे असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये २ हजार १३८.२५ चौरस मीटरचे क्षेत्रफळ या खड्ड्यांनी व्यापले आहे. तर, यामध्ये सर्वाधिक २६४ खड्डे हे वागळे प्रभाग समितीत पडले आहेत. यापैकी ६७४ म्हणजेच १५९९.७५ चौरस मीटरचे खड्डे बुजवल्याचा दावा पालिकेने केला असला तरी ज्याज्या भागात ते बुजवले आहेत, त्यात्या ठिकाणी पुन्हा खड्डे होत असल्याचे चित्र आहे.
मागील काही दिवसांपासून पावसाने शहरात चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागांत रस्त्यांना खड्डेच खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे मुंब्य्रात पालिकेला वेळ नसल्याने खड्डे बुजवण्याचे काम वाहतूक पोलिसांनी केल्याची माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, यंदाच्या पावसात रस्त्यांना खड्डे पडणार नसल्याचा पालिकेचा दावा मात्र यानिमित्ताने खोटा ठरला आहे. ते बुजवण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीसाठी यापूर्वीच प्रत्येकी २५ लाखांची तरतूद केली आहे. त्यानुसार, आता ते बुजवण्याचे काम जेट पॅचर या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुरू झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे अवघ्या एक तासाच्या आतच रस्ता वाहतुकीसाठी खुला होत आहे. तरीही सर्वत्र कोंडी कायम आहे.