सव्वादोनशे कोटींचे ठेवले लक्ष्य
By admin | Published: July 17, 2017 01:11 AM2017-07-17T01:11:07+5:302017-07-17T01:11:07+5:30
महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने वर्षाला सव्वादोनशे कोटींच्या वसुलीचे लक्ष्य ठेवले आहे. ३७६ कोटींचा मालमत्ताकर थकबाकी
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने वर्षाला सव्वादोनशे कोटींच्या वसुलीचे लक्ष्य ठेवले आहे. ३७६ कोटींचा मालमत्ताकर थकबाकी असून नागरिकांनी मुदतीत बिले भरण्याचे आवाहन विभागाचे प्रमुख युवराज भदाणे यांनी केले आहे. महिला बचत गटाने जून महिनाअखेर १ लाख ७२ हजार बिले घरोघरी जाऊन वाटली आहेत.
आयुक्तांनी अंदाजपत्रक सादर करताना करवाढ न करता मालमत्ताकराच्या थकबाकी वसुलीवर भर दिला आहे. सव्वादोनशे कोटींचे उत्पन्न आयुक्तांनी गृहीत धरले असून वसुलीचे आदेश मालमत्ता विभागाला दिले आहेत. महापालिकेत अभय योजना लागू होईल, या आशेवर नागरिकांनी बसू नये, असे भदाणे यांनी सांगितले. मालमत्ताकर विभागाची वसुली कमी झाल्याचा ठपका करनिरीक्षकासह लिपिकावर ठेवून त्यांच्यावर कारवाई केली होती.
महापालिकेने दोन वर्षांपूर्वी अभय योजना सुरू केली होती. योजनेमुळे ५२ कोटी जमा झाले होते. त्यामुळे या वर्षीही अभय योजनेची मागणी सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून होत आहे. नागरिकांनी त्वरित मालमत्ताकर भरावा. तो न भरल्यास दंडाची रक्कम वाढत जाईल. थकबाकीधारकांवर कारवाई सुरू करण्याचे संकेत भदाणे यांनी दिले आहेत.
विभागाने गेल्या वर्षी पाच लाखांपेक्षा जास्त मालमत्ताधारकांना नोटिसा पाठवल्या होत्या. त्यानंतर, सरसकट नोटिसा पाठवून मोठ्या थकबाकीधारकांच्या मालमत्ता जप्त करून लिलावात काढल्या होत्या.
विक्रमी वसुलीचा ध्यास
विभागाने गेल्या वर्षी ११२ कोटींची वसुली अभय योजनेसह केली होती. पालिकेच्या इतिहासात अशी वसुली केव्हाच झाली नव्हती. या वर्षीही विक्रमी वसुली करण्याचा मानस उपायुक्त जमीर लेंगरेकर व करनिर्धारक संकलक शैलेश दोंदे यांनी व्यक्त केला आहे. १२५ कोटींचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.