हवालदाराने वाचवला तरुणाचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 01:21 AM2019-08-01T01:21:24+5:302019-08-01T01:21:54+5:30
वैजोला पुलावरील घटना : साईनाथ कराळे यांनी घेतली पाण्यात उडी
टिटवाळा : कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांविषयी नेहमीच नागरिकांच्या मनात भीती असते. पण, याच पोलिसाच्या वर्दीआड माणूसही लपलेला असतो. याचा प्रत्यय मंगळवारी एका तरुणाला आला. सोनावळे-बापगाव या रस्त्यावर वैजोला गावाजवळील नाल्यावरील पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून दुचाकीसह वाहून जाणाºया राहुल पाटील या तरुणाला पडघा पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया बापगाव दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार साईनाथ कराळे यांनी जीवाची पर्वा न करता पाण्याच्या प्रवाहात उडी घेत वाचवले. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस नाईक डी.आर. पाटीलही घटनास्थळी होते.
बापगावमधील जय मल्हारनगर येथे राहणारा राहुल हा तरु ण सोनावळे येथील एका गोडाउनमध्ये सिक्युरिटीचे काम करतो. ड्युटी संपवून तो सोनावळेमार्गे दुचाकीवरून मंगळवारी रात्री ९.३० वाजता घरी परतत असताना वैजोला येथील नाल्याच्या पुलावरून वाहणाºया पाण्याचा अंदाज त्याला आला नाही. मात्र, पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने तो दुचाकीसह वाहून जाऊ लागला. त्यामुळे प्रसंगावधान राखत त्याने दुचाकी सोडून दिली आणि नाल्यालगत असलेल्या विजेच्या खांबाला पकडून राहिला. त्याचवेळी त्याने मोबाइलवरून पुणे येथील नातेवाइकांना फोन लावून सर्व प्रकार कळवला. त्यांनी तत्काळ ठाणे कंट्रोलला फोन करून या घटनेची माहिती दिली. ठाणे कंट्रोलवरून पडघा पोलीस ठाण्याला फोन केला. याबाबत ९.४५ वाजता बापगाव पोलीस चौकीवरील पोलीस नाईक पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी कराळे यांना सोबत घेऊ न घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा राहुल हा प्रवाहापासून बचाव करण्यासाठी विजेच्या खांबाला पकडून असल्याचे बॅटरीच्या उजेडात पाटील आणि कराळे यांनी पाहिले. तेव्हा कराळे यांनी मागचापुढचा विचार न करता कपडे काढून नाल्याच्या प्रवाहात उडी घेतली आणि राहुल याला सुखरूप नाल्याच्या प्रवाहातून बाहेर काढले. तेव्हा राहुल घाबरलेल्या अवस्थेत होता. त्याला कराळे आणि पाटील यांनी धीर देत दुचाकीवरून घरी सोडले. दोन्ही पोलीस त्याच्यासाठी देवदूत ठरले. पोलिसांनी बजावलेले कर्तव्य आणि दाखवलेली माणुसकी सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.
तरुणाने वाचवले बालिकेचे प्राण : धोधो कोसळणाºया पावसामुळे आलेल्या पुरामुळे कल्याण ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री हाहाकार उडाला होता. मोहनेमधील यादवनगरमध्ये एका घरात अडकलेल्या सहा महिन्यांच्या बालिकेचा जीव प्रशांत तरे या तरुणाने दाखवलेल्या धाडसामुळे वाचू शकला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रशांत यांच्यासह अजय कोट, कैलाश कोट, नंदू पांडे यांनी ४० ते ५० लोकांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले.