सुषमा अंधारे यांनी आपली वकिलीची नोंद दाखवावी, विभक्त पती वाघमारे यांचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 11:30 AM2022-11-14T11:30:25+5:302022-11-14T11:31:59+5:30
Sushma Andhare :
ठाणे : सुषमा अंधारे यांनी आपल्या वकिलीची पदवी किंवा त्याची नोंदणी दाखवावी. उगाच महाराष्ट्राची फसवणूक करू नये, असे आव्हान सुषमा यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी रविवारी ठाण्यात केले तसेच त्या प्राध्यापक किंवा त्यांच्याकडे डाॅक्टरेटही नसल्याचा दावा त्यांनी केला. वाघमारे यांच्यासह शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षप्रवेश केला. त्यावेळी वाघमारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचे पती ॲड. वैजनाथ वाघमारे हे स्वत: वकील असून मातंग समाज आणि महाराष्ट्राच्या हितासाठी तसेच सर्वसामान्य कष्टकरी, महिलांसाठी आशादायी चित्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असल्यामुळे आपण शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्याचे वाघमारे म्हणाले. ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदाश्रमातील सभागृहात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
ठाणे जिल्ह्यातील वाडा, भिवंडी, शहापूर तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड आणि मुंबई येथील अंधेरी अशा विविध विभागांतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच नागरिकांचा यामध्ये समावेश होता.
त्यात शहापूरचे माजी नगराध्यक्ष संतोष शिंदे आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका रजनी शिंदे तसेच भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष इरफान शेख तसेच अंधेरी येथील युवासेनेच्या सुयोग माने यांनी कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला.
पुण्याचे शहरप्रमुख प्रकाश नाना भानगिरे यांच्या पुढाकाराने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.