‘लोकमत’मुळे सुषमादेवी मोटघरे यांना मिळाली एक लाखाची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 11:35 PM2020-01-25T23:35:26+5:302020-01-25T23:35:47+5:30
पती ज्येष्ठ संगीतकार विश्वकांत महेशकर यांचे मंगळवारी निधन झाले.
कल्याण : १९८० च्या दशकात भीमकोकिळा सुषमादेवी मोटघरे यांची भीमगीते लोकांनी डोक्यावर घेतली. उतारवयात मात्र त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. सुषमादेवी यांची ही व्यथा ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच कल्याणमधील शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांनी मोटघरे यांना एक लाखाच्या मदतीचा धनादेश दिला आहे. शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते त्यांना ही मदत देण्यात आली.
पती ज्येष्ठ संगीतकार विश्वकांत महेशकर यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांची हलाखीची परिस्थिती प्रकर्षाने समोर आली. यासंदर्भात ‘लोकमत’च्या २४ जानेवारीच्या अंकात ‘भीमकोकिळेच्या नशिबी उपेक्षितांचे जीणे’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली . या बातमीनंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी शुक्रवारी सायंकाळी मोटघरे यांच्या घरी जाऊन शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते त्यांना एक लाखाच्या मदतीचा धनादेश दिला. नगरसेवक गायकवाड म्हणाले की, सुषमादेवी यांची ‘लोकमत’मध्ये मांडलेली त्यांची व्यथा वाचली. त्यानंतर, त्यांच्या घरी धाव घेऊ न त्यांना एक लाखाची मदत केली. गायकवाड यांनी घेतलेला पुढाकार पाहता शिवसेना नेहमीच उपेक्षितांच्या मदतीसाठी पुढे असल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले.
सुषमादेवी यांना अश्रू अनावर !
मदत मिळताच सुषमादेवी यांना अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या की, माझ्या व्यथेला जागा दिल्याने मी ‘लोकमत’ची शतश: ऋणी आहे.
तसेच मदतीबद्दल मी नगरसेवक गायकवाड आणि शिवसेनेची आभारी आहे. ‘लोकमत’चा वाचक हा संवेदनशील असल्याचे यातून दिसून आले.