संशयित आरोपी अरीब मजीद परतला कल्याणच्या घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:37 AM2021-03-07T04:37:50+5:302021-03-07T04:37:50+5:30
कल्याण : सिरियातील इसिस या दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचा आरोप असलेला अरीब मजीद (रा. कल्याण) या तरुणाला उच्च न्यायालयाने ...
कल्याण : सिरियातील इसिस या दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचा आरोप असलेला अरीब मजीद (रा. कल्याण) या तरुणाला उच्च न्यायालयाने नुकताच सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे न्यायालयीन कोठडीतून सहा वर्षे तीन महिन्यांनी त्याची सुटका झाली आहे. तो शुक्रवारी रात्री उशिरा त्याच्या कल्याणच्या घरी परतला आहे.
उच्च न्यायालयाने अरीब याची एक लाख रुपयांच्या जातमुचलक्याच्या वैयक्तिक जामिनावर सुटका केली आहे. मे २०१४ मध्ये कल्याणमधील चार तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी बाजारपेठ पोलिसात नोंदविली होती. या चौघांमध्ये इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असलेला अरीब तसेच अमन तांडेल, सायम तानकी, फहाद शेख हे होते. काही दिवसांनी या तरुणांनी त्यांच्या कुटुंबीयांना एक मेसेज पाठविला होता. त्यामुळे ते ‘इसिस’मध्ये सहभागी झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली होती. मात्र, चौघांपैकी तिघांचा सुगावा लागलेला नाही.
अरीब हा दहशतवादी कारवायांमध्ये मारला गेल्याची माहिती सप्टेंबर २०१४ मध्ये पुढे आली होती. त्या वेळी त्याच्या नातेवाइकांनी मृत्यूची बातमी ऐकून मृत्यूपश्चात केले जाणारे नमाज पठण केले होते. मात्र, अरीब हा दहशतवादी कारवायांमध्ये मारला गेला नव्हता. नोव्हेंबर २०१४ मध्ये तो तुर्कस्तानमार्गे विमानाने प्रवास करून मुंबई विमानतळावर येत असताना त्याला अटक करण्यात आली. अरीबविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने प्रतिबंधक कारवाया या दहशतवादविरोधी कायद्याखाली गुन्हा नोंदवला होता. २०१५ पासून अरीबने चार वेळा जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, तो फेटाळण्यात आला होता.
दिवसातून दोनदा पोलीस ठाण्यात लावावी लागणार हजेरी
- १७ मार्च २०२० ला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोर्टाने अरीबला जामीन मंजूर केला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या जामीन अर्जाला आव्हान देत स्थगिती दिली होती. त्यानंतर तपास यंत्रणेच्या अपील अर्जावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला होता.
न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवत तपास यंत्रणेचा जामीन देण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटल्याने अरीबला २३ फेब्रुवारी २०२१ ला सशर्त जामीन देण्यात आला.
- अरीबने त्याचा पासपोर्ट तपास यंत्रणांकडे जमा करावा. कल्याणमधील राहते घर सोडू नये. दोन महिने दिवसातून दोन वेळा कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात हजेरी लावावी तसेच आंतरराष्ट्रीय फोन कॉल घेऊ नयेत, या अटींवर त्याला जामीन देण्यात आला आहे.
-----------------------------