संशयित रुग्ण तपासणीसाठी रांगेत; परदेशातून आलेल्यांना मानसिक त्रास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 12:10 AM2020-03-14T00:10:30+5:302020-03-14T00:10:42+5:30
विलगीकरण कक्ष नावालाच
कल्याण : कोरोना व्हायरसबाबत लोकांमध्ये वाढलेल्या धास्तीपोटी विदेशातून येणाऱ्या नागरिकांना कमालीचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. असाच प्रकार दुबई येथून कल्याणमध्ये आलेल्या एका तरुणासोबत बुधवारी घडला. परिसरातील नागरिकांनी मेसेज करून त्याला घरातच राहण्याचे सल्ले देणे सुरू केल्याने, या तरुणाने स्वत:हून तपासणीसाठी रुग्णालय गाठले. रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्याला चक्क अन्य रुग्णांच्या रांगेत उभे केल्याने कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत पालिका किती गंभीर आहे, हे दिसून येते.
दुबई येथून बुधवारी एका तरुण कल्याणमध्ये परतला. त्याची विमानतळावर वैद्यकीय तपासणी झाली. त्यात काहीच निष्पन्न न झाल्याने त्याला कल्याणच्या घरी सोडण्यात आले. मात्र, हा प्रकार परिसरातील नागरिकांना कळताच, त्यांनी १४ दिवस घरातच राहा, बाहेर निघू नकोस, असे मेसेज या तरुणाला पाठवण्यास सुरुवात केली. यामुळे तरुणाला मानसिक धक्का बसला. लोकांचा संशय दूर करण्यासाठी त्याने स्वत:ची पुन्हा तपासणी करून घेण्याचे ठरवले. त्यानुसार आम आदमीच्या कार्यकर्त्यांसोबत महापालिकेचे रुक्मिणीबाई रुग्णालय त्याने गाठले. तिथे त्याने स्वत:ची माहिती सांगितली. तेव्हा वैद्यकीय कर्मचाºयांनी त्याला चक्क अन्य रुग्णांच्या रांगेत उभे राहण्यास सांगितले. या प्रकारामुळे महापालिका या जीवघेण्या आजाराबाबत किती गंभीर आहे, हे स्पष्ट होत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.