नागरिकांनी पकडलेला संशयित चोरटा पोलीस ठाण्यातून निसटला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 10:18 PM2021-08-20T22:18:29+5:302021-08-20T22:21:23+5:30
चोरीच्या आरोपातील संशयित चोरटयाला स्थानिक रहिवाशांनी वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर चौकशीदरम्यान पाणी पिण्याचा बहाणा करीत त्याने पलायन केल्याची घटना नुकतीच घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: चोरीच्या आरोपातील संशयित चोरटयाला स्थानिक रहिवाशांनी वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर चौकशीदरम्यान पाणी पिण्याचा बहाणा करीत त्याने पलायन केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्नी नगरसेविका परिषा सरनाईक यांनी पोलीस आयुक्त जयजित सिंह यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
वर्तकनगर परिसरात गेल्या दोन वर्षांपासून महानगर गॅसची जोडणी सुरू आहे. गॅसच्या मीटर रिडींगच्या बहाण्याने खोटे ओळखपत्र दाखवून घरामध्ये शिरून चोरी करणे किंवा एटीएम कार्ड चोरून एटीएममधून पैसे काढणे, असे प्रकार या भागात घडले आहेत. बहुतांश घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिला असल्यामुळे अशा प्रकारामुळे येथील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. या परिसरातील दक्ष नागरिकांनी प्रमोद मयेकर (४७, रा. मुंबई) या संशयित आरोपीला १७ आॅगस्ट २०२१ रोजी दुपारी पकडून वर्तकनगर पोलिसांच्या हवाली केले होते.
मात्र, चौकशी दरम्यान त्याने पाणी पिण्याचा बहाणा करीत पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले. दरम्यान, या संशयितावर कोणतीही कारवाई न करता पोलिसांनी कसे काय सोडून दिले? पोलीस असे बेजबाबदार कसे वागू शकतात? असा सवाल करीत याप्रकरणी चौकशीची मागणी नगरसेविका सरनाईक यांनी पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
* प्रमोद या संशयिताला नागरिकांनी पोलीस ठाण्यात आणले होते. त्याच्या आधारकार्डद्वारे पडताळणी केली जात होती. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नव्हता. चौकशी दरम्यान पाणी पिण्याच्या बहाण्याने पलायन केले. त्याच्याविरुद्ध १७ आॅगस्ट रोजी रात्री चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याने एटीएम कार्ड चोरुन ३५ हजार रुपये लुबाडल्याचा संशय असल्याने त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.
संतोष घाटेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वर्तकनगर पोलीस ठाणे.