आपला दवाखान्याच्या कंत्राटात घोळ करणाऱ्या अधिकाऱ्यास निलंबित करा; भाजपची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 01:38 AM2021-02-13T01:38:25+5:302021-02-13T01:38:33+5:30
चूक दुरुस्त करण्याची महापौरांची ग्वाही
ठाणे : प्रशासकीय घोळामुळे सत्ताधारी शिवसेनेच्या आपला दवाखाना या महत्त्वांकाक्षी प्रकल्पाला अखेरची घरघर लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ही योजना सुरू करताना जॉइंट व्हेंचरमध्ये असलेल्या कंपनीला हे काम देणे अपेक्षित होते; परंतु महापालिकेच्या प्रशासकीय घोळामुळे या कामाचे कार्यादेश जी कंपनी निविदा प्रक्रियेत सहभागीच झाली नव्हती. तिला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यामुळे ही प्रशासकीय चूक करणाऱ्या अधिकाऱ्यास निलंबित करावे, अशी मागणी भाजपने महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली. सत्ताधारी शिवसेनेने या प्रकरणात तांत्रिक चुका झाल्या असल्याने त्या दुरुस्त करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे.
दोन वर्षांपूर्वी आपला दवाखान्याची सुरुवात ठाण्यात झाली होती. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांत २५ दवाखाने सुरू झाले आहेत; परंतु आता निविदा प्रक्रियेत घोळ झाल्याचे समोर आले आहे. ज्या कंपनीला जॉइंट व्हेंचरमध्ये हे काम लागले होते. तिला ते न देता जी कंपनी यात सहभागी झालीच नव्हती अशा कंपनीला महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने कार्यादेश दिल्याचे समोर आले. त्यामुळे जॉइंट व्हेंचरमधील एका कंपनीने महापालिकेला नोटीसदेखील बजावली आहे.
त्यानंतर आता भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना पत्रव्यवहार करून असा घोळ घालणाऱ्या अधिकाऱ्यास निलंबित करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनीदेखील कोरोना काळात सर्व ठराव हे बेकायदेशीर पद्धतीने झालेले आहेत. त्यामुळे त्या सर्वच प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी केली. या प्रकरणात योग्य तो न्याय निवाडा झाला नाही तर त्याच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
...तर न्यायालयात जाऊ
जॉइंट व्हेंचरमधील एक कंपनी असलेली इंद्रायणी कन्स्ट्रक्शनचे संचालक सुनील नागरगोजे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, यासंदर्भात आम्ही महापालिकेला नोटीस दिलेली आहे. त्याला आता १५ दिवस उलटून गेलेले आहेत. पालिकेने ही चूक दुरुस्त करावी अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तांत्रिक चुका दुरुस्त करून ‘आपला दवाखाना’ सुरूच ठेवू - नरेश म्हस्के
‘आपला दवाखाना’ हा एक चांगला उपक्रम आहे. ज्यामधून ठाणेकरांना मोफत आरोग्य तपासणी आणि औषधे मिळत आहेत. त्यामुळे याबाबत ज्या काही तांत्रिक चुका झाल्या असतील त्या दूर करून आपला दवाखाना सुरूच ठेवणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.