डॉ. योगेश शर्मा आणि डॉ. सुचितकुमार कामखेडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई
By अजित मांडके | Published: March 4, 2023 09:04 PM2023-03-04T21:04:19+5:302023-03-04T21:04:47+5:30
डॉक्टरांना चांगल्या सोई सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही रुग्णालय प्रशासनाची असतांनाही त्याकडे कानाडोळा किंवा दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले होते.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा यांच्यावर ठाणे महापालिकेने निंलबनाची कारवाई केली आहे. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रुग्णालयातील नवीन प्रसूतीगृह, वाचनालय आदींचे लोकार्पण केले. यावेळी शिकाऊ डॉक्टरांच्या हॉस्टेलमध्ये सुविधा मिळत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे असुविधा देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली.
मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अंतर्गत शहरातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपुजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूतीगृहासह वाचनालय, वृत्तपत्र वाचन केंद्राचेही लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रसारमाध्यमांशी एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. या रुग्णालयातील बेडची क्षमता वाढविण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या. तसेच या रुग्णालयावरील ताण वाढत आहे. परंतु असे असतांना येथील डॉक्टर प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा करीत आहेत. मात्र, याच शिकाऊ डॉक्टरांच्या हॉस्टेलमध्ये असुविधा असल्याचे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
वास्तविक पाहता या डॉक्टरांना चांगल्या सोई सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही रुग्णालय प्रशासनाची असतांनाही त्याकडे कानाडोळा किंवा दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार अगदी काही वेळेतच याचा ठपका ठेवत या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा आणि उप अधिष्ठाता डॉ. सुचितकुमार कामखेडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली. याला एका वरीष्ठ अधिकाऱ्याने देखील दुजोरा दिला.