सतत गैरहजर राहून नोटीसांना न जुमानणाऱ्या वरिष्ठ लिपिकावर निलंबनाची कारवाई
By धीरज परब | Published: May 29, 2023 07:22 PM2023-05-29T19:22:35+5:302023-05-29T19:22:51+5:30
विवेकानंद भोईर हे कामावर सातत्याने गैरहजर राहण्यासह नोटीसना जुमानत नसल्याने अखेर त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेतील वरिष्ठ लिपिक विवेकानंद भोईर हे कामावर सातत्याने गैरहजर राहण्यासह नोटीसना जुमानत नसल्याने अखेर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. भोईर यांची १२ जानेवारी २०२३ रोजी नगररचना विभागात नियुक्ती केली गेली होती. मात्र ते कामावर हजर नसल्याने माहिती अधिकार ची कामे खोळंबून लोकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यांना अन्य विभागात बदली करण्याचे नगररचना विभागाने पत्र दिल्यावर उपायुक्त मारुती गायकवाड यांनी भोईर यांना १७ फेब्रुवारी रोजी नोटीस बजावली होती.
२७ मार्च रोजी भोईर यांची नियुक्ती आस्थापना विभागात केल्यानंतर देखील ते कामावर गैरहजर रारात होते. त्यामुळे १७ एप्रिल व ११ मे रोजी त्यांना पुन्हा नोटीस बजावण्यात आली. आस्थापना विभागात तर भोईर हे हजेरी लावून नंतर निघून जायचे व कामावर नसल्याचे आढळून आले. वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेता १० मे पर्यंत ते गैरहजर असल्याने २६ मे रोजी त्यांना निलंबित करण्याचा आदेश उपायुक्त मारुती गायकवाड यांनी काढला आहे.