करअधीक्षक, लिपिकावर निलंबनाची कारवाई
By admin | Published: March 16, 2017 02:46 AM2017-03-16T02:46:27+5:302017-03-16T02:46:27+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘क’ प्रभागातील करअधीक्षक चंद्रकांत पाटील व वरिष्ठ लिपिक मंगला पाटील यांनी करवसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यात कसूर
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘क’ प्रभागातील करअधीक्षक चंद्रकांत पाटील व वरिष्ठ लिपिक मंगला पाटील यांनी करवसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यात कसूर केल्याप्रकरणी महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी त्यांना बुधवारी निलंबित केले.
महापालिकेने करवसुलीचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे. त्यासाठी जोरदार मोहीम सुरू आहे. आयुक्तांनी मंगळवारी ‘क’ प्रभाग समितीच्या कार्यालयात दोन तास झाडाझडती घेतली. त्यानंतर, आयुक्तांनी ही कारवाई केली. करअधीक्षक व वरिष्ठ लिपिकांविरोधात निलंबनाची कारवाई केली असली तरी प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांच्याविरोधात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडून समाधानकारक खुलासा न मिळाल्यास त्यांचेही निलंबन केले जाणार आहे. वानखेडे यांच्याप्रमाणेच प्रभागातील लिपिक वसंत बावीस्कर, रमेश राजपूत, शांताराम तायडे, जयवंत चौधरी यांच्या विरोधातही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
प्रत्येक प्रभाग कार्यालयाची आयुक्तांनी अशीच झाडाझडती सुरू ठेवल्यास निलंबनाच्या कारवाईचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोटिशीत महापालिकेच्या आर्थिक करवसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यात कसूर केली, असे म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. (प्रतिनिधी)