रुंदीकरणाला स्थगिती

By admin | Published: December 6, 2015 01:26 AM2015-12-06T01:26:35+5:302015-12-06T01:26:35+5:30

रस्ता रुंदीकरणाच्या दुसऱ्या दिवशी १७ दुकाने तोडण्यास न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती मिळविण्यात व्यापारी यशस्वी झाले आहेत. तर, दुसरीकडे पुढील कारवाई सुरूच

Suspension of breadth | रुंदीकरणाला स्थगिती

रुंदीकरणाला स्थगिती

Next

- सदानंद नाईक,  उल्हासनगर

रस्ता रुंदीकरणाच्या दुसऱ्या दिवशी १७ दुकाने तोडण्यास न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती मिळविण्यात व्यापारी यशस्वी झाले आहेत. तर, दुसरीकडे पुढील कारवाई सुरूच ठेवण्याचा निर्धार आयुक्तांनी व्यक्त केला आहे. दोन दिवसांत ५०पेक्षा अधिक दुकानांवर कारवाई होऊन बहुतांश व्यापाऱ्यांनी स्वत:हून पाडकाम सुरू केले आहे.
महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पालिकेने मोठ्या धूमधडाक्यात सुरू केले. शिवाजी चौक परिसरातील मनीष इलेक्ट्रॉनिक मार्केट, कराची हॉटेल, मोहन इलेक्ट्रॉनिक दुकान, बॅण्ड बॉक्स इमारत, जयशंकर हॉटेल, दीपक बार, विजय सेल्स आदींवर पाडकाम कारवाई केली आहे. व्यापाऱ्यांचा विरोध मावळला असून, त्यांनी स्वत:हून दुकानांवर कारवाई सुरू केली. १००ऐवजी ८० फुटी रस्ता रुंदीकरणाला महासभेने मंजुरी देऊन प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. मात्र, प्रस्ताव शासनाने विखंडित करताच पालिकेने रुंदीकरणाचे काम सुरू केले.

पर्यायी जागेची मागणी
उपमहापौर पंचशीला पवार यांनी पुढाकार घेऊन रस्ता रुंदीकरणात १०० टक्के दुकानासाठी व ज्यांच्याकडे सनद व बांधकाम परवाना आहे, अशा व्यापाऱ्यांना पर्यायी जागा देण्याची मागणी शासनाकडे केली आहे.
आमदार ज्योती कलानी, माजी आमदार कुमार आयलानी, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र
चौधरी यांच्यासह सेना-भाजपा पदाधिकारी, इतर पक्ष नेते व व्यापारी मुख्यमंत्र्यांची दोन दिवसांत भेट घेऊन पर्यायी जागेची मागणी करणार आहेत.

निधीअभावी रस्ता लटकणार एमएमआरडीएने
३ वर्षांपूर्वी महामार्गाचे काम हाती घेतले होते. पालिकेने रस्ता रुंदीकरण न केल्याने ३१ मार्च २०१५ रोजी रस्त्याच्या कामाची मुदत व निधी संपला आहे. अंबरनाथ ते वांगणीदरम्यानच्या रस्त्यावर संपूर्ण निधी खर्च झाल्याचे दाखविले आहे. उर्वरित रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केले असून, त्यासाठी विभागाकडे अर्ज करावा लागणार आहे.

१७ दुकानांना न्यायालयाची स्थगिती
उच्च न्यायालयाने रुंदीकरणाच्या आड येणारी १७ दुकाने तोडण्यास दुसऱ्याच दिवशी तात्पुरती स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयाने रस्त्याचे काम रखडणार असून, इतर व्यापारी त्यांचा कित्ता गिरविणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच दुसऱ्या एका निर्णयात न्यायालयाने एका दुकानालाही स्थगिती दिली आहे. मात्र, शुक्रवारीच ते दुकान कारवाईत जमीनदोस्त झाले आहे.

गटारासाठी पालिकेचा राखीव निधी : रुंदीकरणानंतर रस्ताबांधणीचे काम होणार, ही शक्यता लक्षात घेऊन पालिकेने रस्त्याखालील भुयारी गटार व रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे नाले बांधण्यासाठी राखीव निधी ठेवल्याची माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली आहे.

एमएमआरडीए आयुक्त यू.पी.एस. मदान यांना साकडे
पालिका आयुक्त मनोहर हिरे, शहर अभियंता भरत भाटिया, आमदार ज्योती कलानी, महापौर अपेक्षा पाटील, उपमहापौर पंचशीला पवार, स्थायी समिती सभापती जया माखिजा यांच्यासह पक्ष पदाधिकाऱ्यांनी एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांची ३ डिसेंबर रोजी भेट घेऊन कर्जत-कल्याण महामार्ग रुंदीकरण होताच तो तत्काळ बांधण्याची मागणी केली आहे. त्यांनीही रस्ताबांधणीला प्राधान्य देणार असल्याचे तोंडी आश्वासन दिले आहे.

उल्हासनगर-अंबरनाथकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल
ठाणे : अनधिकृत बांधकामे तोडताना कल्याण-अंबरनाथ रोडवरील उल्हासनगर शहर परिसरातील वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी या रोडवरील वाहतूक वळविण्यात आली आहे. यानुसार, जड व अवजड वाहनांना वालधुनी ब्रीजच्या पुढे महाराणा प्रताप चौक येथून जाण्यास सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत प्रवेश बंद केला आहे. पर्यायी मार्गाने ही वाहने वालधुनी ब्रीज महाराणा प्रताप चौक उजव्या बाजूस वळून चक्कीनाका, नेवाळी नाकामार्गे इच्छितस्थळी जातील. रुग्णवाहिका, अग्निशमन, पोलीस वाहने तसेच कारवाईसाठीच्या वाहनांना ही अधिसूचना लागू राहणार नाही.

Web Title: Suspension of breadth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.