पोलिसांसह परिचितांना विना तिकिट प्रवास घडवल्याने वाहकाचे निलंबन; पालिकेच्या परिवहन सेवेतील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2018 03:40 PM2018-02-03T15:40:51+5:302018-02-03T15:41:06+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेतील एका बसमधील वाहकानं दोन पोलीस कर्मचा-यांसह 4 ते 5 परिचितांना विना तिकिट प्रवास घडवल्याने आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी त्या वाहकाला निलंबित केले असून त्या प्रवाशांच्या तिकिटदरासह दंडात्मक शुल्क कंत्राटदाराच्या बिलातून कपात करण्याचे निर्देश लेखा विभागाला दिले आहेत.
भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेतील एका बसमधील वाहकानं दोन पोलीस कर्मचा-यांसह 4 ते 5 परिचितांना विना तिकिट प्रवास घडवल्याने आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी त्या वाहकाला निलंबित केले असून त्या प्रवाशांच्या तिकिटदरासह दंडात्मक शुल्क कंत्राटदाराच्या बिलातून कपात करण्याचे निर्देश लेखा विभागाला दिले आहेत.
पालिकेची परिवहन सेवा मेसर्स के. आर. सोनावणे अॅन्ड सन्स या कंपनीमार्फत कंत्राटी पद्धतीवर चालविली जात असून त्यातील सुमारे ३०० कर्मचारी देखील कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत. या परिवहन सेवेच्या कारभाराची माहिती घेण्याच्या उद्देशाने आयुक्त, आगार व्यवस्थापक सुरेश कलंगे यांच्यासोबत शुक्रवारी दुपारच्या सुमारास भार्इंदर (प) रेल्वे स्थानक ते चौक बस क्रमांक ६३७ मधून प्रवास करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी बसचा वाहक मनोहर जाधव याने दोन पोलीस कर्मचारी व ४ ते ५ परिचित प्रवाशांना विनातिकिट प्रवास घडवून आणल्याचे निदर्शनास आले. वाहकाने पालिकेच्या आर्थिक हितास बाधा आणून कर्तव्यात गैरशिस्त केल्याप्रकरणी आयुक्तांनी त्याला त्वरीत निलंबित करण्याचा आदेश कंत्राटदाराला दिला. तसेच त्या विनातिकिट प्रवाशांनी केलेल्या प्रवासाच्या अंतराच्या दरासह दंडात्मक शुल्काची २ हजार १०७ रुपये रक्कम कंत्राटदाराच्या बिलातून कपात करण्याचे निर्देश लेखाविभागाला दिले. परिवहन सेवेतील हा प्रकार वारंवार घडत असल्याप्रकरणी प्रशासनाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने पालिकेतील एका वरीष्ठ लिपिकासह वर्ग ३ चे दोन कर्मचारी व 12 खासगी सुरक्षा रक्षकांना परिवहन सेवेत तिकीट तपासणीस तसेच दक्षता पथकाचा अतिरिक्त कारभार काही दिवसांपूर्वीच सोपवला आहे. परिवहन सेवेत पोलिसांना मोफत प्रवासासाठी रेल्वे तसेच बेस्टच्या धर्तीवर पालिकेला पुरेशी रक्कम अदा करणे अपेक्षित आहे. मात्र ती अद्याप जमा करण्यात न आल्यानेच त्यांना विना तिकीट प्रवास करण्यास मनाई असल्याचे आयुक्तांकडुन सांगण्यात आले.