आंदोलनाचा इशारा देणा-या चालकाचे निलंबन, आकसापोटी कारवाई : कल्याण बस डेपोचा भोंगळ कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:52 AM2017-10-12T01:52:30+5:302017-10-12T01:52:43+5:30
कल्याण बस डेपोतील चालक आणि वाहकांचे कामाचे तास कापल्याप्रकरणी दाद मागण्यासाठी मनसे राज्य परिवहन कामगार सेनेतर्फे आंदोलनाचा इशारा देणारे
कल्याण : कल्याण बस डेपोतील चालक आणि वाहकांचे कामाचे तास कापल्याप्रकरणी दाद मागण्यासाठी मनसे राज्य परिवहन कामगार सेनेतर्फे आंदोलनाचा इशारा देणारे चालक महादेव म्हस्के यांच्याविरोधात कल्याण डेपो व्यवस्थापकांनी निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे अन्य चालकवाहकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी आहे.
कामाचे तास भरूनही काही वाहक व चालकांचे कामाचे तास कापण्यात आले होते. याप्रकरणी मनसे राज्य परिवहन कामगार सेनेने कल्याण डेपो प्रशासनाला निवेदन दिले होते. ही कारवाई प्रशासनाने मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यासाठी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर व महिलाध्यक्ष ऊर्मिला तांबे यांनी डेपो व्यवस्थापकांची २७ सप्टेंबरला भेट घेतली. या वेळी चर्चेसाठी म्हस्के आणि पोलीसही उपस्थित होते. त्यानंतर, डेपो व्यवस्थापनाने म्हस्के यांना ८ आॅक्टोबरला निलंबित केले आहे. डेपो व्यवस्थापनाला धमकावल्याचे निलंबन पत्रात म्हटले आहे. पोलीस बंदोबस्तात चर्चा सुरू असताना धमकावण्याचा आरोप कितपत योग्य आहे, असा मुद्दा म्हस्के यांनी उपस्थित केला आहे.
गरोदर व आजारी महिला वाहकांना लांब पल्ल्यांच्या गाडीवर ड्युटी लावली जाते. खराब, खड्डेमय रस्ते व पावसामुळे फेºया कमी झाल्या. त्यासाठीही चालक व वाहकांना जबाबदार धरले होते. तेव्हाही चालकवाहकांना नोटिसा पाठवल्या होत्या. तेव्हा म्हस्के यांनी संघटनेद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता. तेव्हा म्हस्के यांची वाडा बस स्थानकात बदली करण्यात आली. तेव्हा मनसेने डेपो व्यवस्थापकाची भेट घेतली. जिल्हा नियंत्रकांनी म्हस्के यांच्याविरोधातील कारवाई मागे घेतली होती. पुन्हा आंदोलनाचा इशारा देणे त्यांना महागात पडले आहे.