पाणी जोडणीच्या वाढीव दराला स्थगिती
By admin | Published: May 25, 2017 12:07 AM2017-05-25T00:07:34+5:302017-05-25T00:07:34+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भांडवली अंशदान दर लागू करण्याच्या निर्णयाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भांडवली अंशदान दर लागू करण्याच्या निर्णयाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. या भांडवली अंशदानामुळे नवीन नळ जोडणीसाठी प्रति सदनिका २७ हजारापर्यंत दर आकारला जाणार होता. त्यामुळे त्याचा थेट फटका हा सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बसणार होता. या वाढीव दराला पाणीपुरवठा मंत्र्यांनीच स्थगिती दिली आहे. त्यामुळे तूर्त ही दरवाढ मागे घेण्यात आली आहे.
पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत आमदार किसन कथोरे यांनी प्राधिकरणाची भांडवली अंशदान वर्गणी बंद करावी तसेच दीड वर्षापासून बंद असलेल्या नळजोडण्या देण्याची प्रक्रि या पुन्हा सुरु करावी, अशी मागणी केली. त्यावर पाणीपुरवठा मंत्र्यांनी भांडवली अंशदान वर्गणीला तातडीने स्थिगती देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. तसेच दीड वर्षापासून बंद असलेल्या नवीन नळजोडण्या देण्याची प्रक्रि या तातडीने सुरु करण्याचे व नागरिकांनी काही नळजोडण्या घेतल्या असल्यास त्यांना कायदेशीर करण्याचे आदेश दिले. या नळ जोडण्यांना मीटरप्रमाणे बिल पाठवावे तोपर्यंत या नळजोडण्या तोडण्याबाबत कोणतीही कार्यवाही करू नये, असेही आदेश लोणकर तसेच राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.
प्राधिकरणाने अलिकडेच जारी केलेल्या परिपत्रकानुसार, भांडवली अंशदान दर लागू केले होेते. या पार्श्वभूमीवर कथोरे यांनी भांडवली अंशदान दर रद्द करण्याची मागणी केली होती. आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्ष वामन म्हात्रे, संभाजी शिंदे, किरण भोईर, संजय भोईर, राम पातकर, मुख्याधिकारी देविदास पवार उपस्थित होते.