उल्हासनगरात भांडवली कर मूल्याला स्थगिती, नागरिकांना दिलासा; खासदार शिंदेंनी दसरा केला गोड
By सदानंद नाईक | Published: October 6, 2022 05:56 PM2022-10-06T17:56:39+5:302022-10-06T17:56:49+5:30
उल्हासनगरात शहरविकासाचे कामे राबविण्यासाठी भांडवली कर मूल्य प्रणाली प्रस्तावाला तत्कालीन सत्ताधारी व विरोधी पक्षांनी यापूर्वी मान्यता दिली.
उल्हासनगर - शहरात भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती मिळण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केल्याने, शासनाने १ एप्रिल २०२२ पासून लागू केलेल्या भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती दिली. पाणी समस्या पाठोपाठ भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती देऊन नागरिकांचा दसरा गोड केल्याची माहिती अरुण अशान यांनी दिली.
उल्हासनगरात शहरविकासाचे कामे राबविण्यासाठी भांडवली कर मूल्य प्रणाली प्रस्तावाला तत्कालीन सत्ताधारी व विरोधी पक्षांनी यापूर्वी मान्यता दिली. मान्यता दिली त्या वर्षांपासून महापालिकेने भांडवली कर मूल्य प्रणाली १ एप्रिल २०२२ पासून सुरुवात केली. भांडवली कर मूल्य प्रणालीमुळे नागरिकांना दामदुप्पट मालमत्ता कर बिले आल्याने, त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. दरम्यान भांडवली कर मूल्य प्रणाली आपल्या अंगलट येणार म्हणून काहीजण न्यायालयात गेली. तर आमदार कुमार आयलानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून भांडवली कर मूल्य प्रणाली रद्द करण्याची मागणी केली. तर मनसेसह सामाजिक संघटना व अन्य पक्षांनी महाहस्ताक्षर अभियान राबविले.
राज्य शासनाने आमदार कुमार आयलानी यांच्या पत्रावरून महापालिका आयुक्तांना भांडवली कर मूल्याबाबत सद्यस्थितीचा अहवाल पाठविण्यास सांगितल्यावर, आयुक्त अजीज शेख यांनी भांडवली मूल्य करा बाबत वास्तवदर्शी अहवाल शासनाला गेल्या आठवड्यात पाठविला. दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे अरुण अशान यांनी भांडवली कर मूल्य प्रणाली बाबतची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांना दिल्यावर, खासदार शिंदे यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शासनाने भांडवली कर मूल्य प्रणाली प्रक्रियेला १ एप्रिल २०२२ पासून लावण्यास स्थगिती दिली. शिंदे सरकारच्या निर्णयाने नागरिकांना दसऱ्याला गोड बातमी मिळून दिलासा मिळाला. अशी प्रतिक्रिया अरुण अशान यांनी दिली. दसऱ्या पूर्वी शहरातील पाणी टंचाई समस्या सोडविण्यासाठी एक्सप्रेस फिडर साठी एमआयडीसी कडून एनओसी देण्यात खासदार शिंदे यांना यश आले. तर शहाड पाणी पुरवठा केंद्र हस्तांतरणची मागणीही करण्यात आली.
शहरवासीयांचा दसरा गोड
महापालिकेने भांडवली कर मूल्य प्रणालीद्वारे मालमत्ता कर दामदुप्पट आल्याने नागरिकांत असंतोष निर्माण झाला होता. मात्र पाणी समस्या सोडविण्या पाठोपाठ भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती दिल्याने, शहरवासीयांचा दसरा गोड झाला.