ठाण्यात एनसीसी कॅडेट्सना बेदम मारहाण करणाऱ्या शुभम प्रजापतीचे निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 06:30 AM2023-08-05T06:30:19+5:302023-08-05T06:31:08+5:30
या मारहाणीचा प्रकार संपूर्ण राज्यभरात गाजत असतानाच मारहाण करणाऱ्या प्रजापतीविरोधात कोणतीही तक्रार करायची नसल्याचे ज्यांना मारहाण झाली त्या विद्यार्थ्यांनी ठाण्याच्या पोलिसांना दिलेल्या जबाबात स्पष्ट केले आहे.
ठाणे : ठाण्यातील जोशी बेडेकर (ठाणा कॉलेज) महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी एनसीसीचा वरिष्ठ कॅडेट शुभम प्रजापती याला एनसीसीमधून निलंबित करण्यात आले आहे. तर या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
या मारहाणीचा प्रकार संपूर्ण राज्यभरात गाजत असतानाच मारहाण करणाऱ्या प्रजापतीविरोधात कोणतीही तक्रार करायची नसल्याचे ज्यांना मारहाण झाली त्या विद्यार्थ्यांनी ठाण्याच्या पोलिसांना दिलेल्या जबाबात स्पष्ट केले आहे.
मारहाण झालेल्या एनसीसीच्या या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय तपासणीलाही विरोध केला आहे. २६ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ५:४५ वाजण्याच्या सुमारास कारगिल दिनानिमित्त एनसीसीच्या विद्यार्थ्यांची परेड सुरू होती. याच दरम्यान ठाणा कॉलेजमध्ये यातील दहा विद्यार्थ्यांना प्रजापती मारहाण करत असतानाचा व्हिडीओ ३ ऑगस्ट रोजी प्रसारित झाला.
हा व्हिडीओ एका माजी विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या लायब्ररीमधून अभ्यासादरम्यान काढला होता. या दहा विद्यार्थ्यांनी आणि ठाणा महाविद्यालयाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मारहाण करणारा शुभम प्रजापती हा एनसीसीचा वरिष्ठ कॅडेट भांडूपच्या कॉलेजमध्ये शिकायला आहे. तो ठाणा कॉलेजच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी येत होता.
मारहाण झालेल्यांची विद्यार्थ्यांची नावे
जितेंद्र रस्तोगी, सार्थक चोरमाले, अथर्व पवार, शुभम दाते, सोमराज शिंदे, कुणाल खरात, कुणाल कोळेकर, आकाश चतुर्वेदी आणि हर्ष धिवर अशी मारहाण झालेल्यांची नावे असून, त्यांनी आपली कोणतीही तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले.
विधिमंडळातही उमटले पडसाद
ठाणे येथील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सिनिअर विद्यार्थ्यांकडून झालेल्या मारहाणीची गंभीर दखल घेत असा निर्दयी प्रकार करणाऱ्यांविरुद्ध राज्य सरकार कडक कारवाई करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. तर, मारहाणीच्या चौकशीसाठी मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक महेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीकडे सरकारचे लक्ष वेधले.
प्लास्टिकच्या पाइपने मारले
ठाणा कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना मानवंदना देताना, बट सॅल्यूट करताना चूक केल्यामुळे शुभमने जितेंद्र रस्तोगी याच्यासह दहा मुलांना प्लास्टिकच्या पोकळ पाइपने मारले, अशी माहिती या मुलांनी ठाणेनगर पोलिसांना ३ ऑगस्ट रोजी जबाबामध्ये दिली. शुभम याच्याविरुद्ध तक्रार नसून वैद्यकीय तपासणीही करायची नसल्याचे या मुलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये म्हटले आहे.
एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या शुभम प्रजापती याला एनसीसीमधून निलंबित केले आहे. ठाणेनगर पोलिस ठाण्यात पोलिसांनीच अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
- गणेश गावडे, पोलिस उपायुक्त, ठाणे