आश्वासनानंतर उपोषण स्थगित
By admin | Published: October 29, 2015 11:22 PM2015-10-29T23:22:48+5:302015-10-29T23:22:48+5:30
लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच पोल्ट्री व्यावसायिक यांची संयुक्त बैठक येत्या पंधरा दिवसांच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयात बोलविण्यात येईल
वाडा : लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच पोल्ट्री व्यावसायिक यांची संयुक्त बैठक येत्या पंधरा दिवसांच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयात बोलविण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाल्याने कुक्कुटपालन व्यावसायिकांनी आपले उपोषण आ. विलास तरे यांच्या हस्ते थंड पेय घेऊन संपवले.
शेतीला जोडधंदा म्हणून येथील शेतकरी कुक्कुटपालन हा व्यवसाय करतात. यासाठी लागणारे साहित्य सगुणा, व्यंकटेश्वरा, प्रीमिअम, आनंद अॅग्रो यासारख्या कंपन्या शेतकऱ्यांना पुरवतात. खराब हवामानात व्यवसायातील तोट्याला शेतकऱ्यांना जबाबदार धरतात आणि त्यांच्या हक्काचे आणि परिश्रमाचे पैसे कापून घेऊन कंपन्या मनमानी करतात. या कंपन्यांवर अंकुश आणावा, या मागणीसाठी वाड्यातील कुक्कुटपालन व्यावसायिकांनी मंगळवारपासून उपोषण सुरू केले होते.
या उपोषणाची दखल घेत आमदार विलास तरे यांनी गुरुवारी दुपारी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर तरे यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून कुक्कुटपालन व्यवसायात शेतकऱ्यांची होणारी लूट त्यांच्या कानावर घातली. त्यानंतर, पालकमंत्री, वरिष्ठ अधिकारी, पोल्ट्री व्यावसायिक व कंपन्यांची संयुक्त बैठक बोलावून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर हे उपोषण संपविण्यात आले. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे या व्यवसायीकांत आशेचा किरण निर्माण झाला आहे. (वार्ताहर)