बॉलीवूडचा कोरिओग्राफर चौकशीच्या जाळ्यात, आरोपीच्या खात्यातून पैसे जमा झाल्याने वाढला संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 01:55 AM2018-01-12T01:55:39+5:302018-01-12T01:55:45+5:30
मोटारींमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून गंडा घालणाºया सागर कोकास याच्या अटकेनंतर केलेल्या तपासात बॉलीवूडमधील एका प्रसिद्ध कोरिओग्राफरच्या बँक खात्यात याच घोटाळ्यासंबंधीची रक्कम जमा झाल्याच्या संशयावरून ठाणे आर्थिक गुन्हे शाखेमार्फत त्याची चौकशी सुरू झाली आहे.
ठाणे : मोटारींमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून गंडा घालणाºया सागर कोकास याच्या अटकेनंतर केलेल्या तपासात बॉलीवूडमधील एका प्रसिद्ध कोरिओग्राफरच्या बँक खात्यात याच घोटाळ्यासंबंधीची रक्कम जमा झाल्याच्या संशयावरून ठाणे आर्थिक गुन्हे शाखेमार्फत त्याची चौकशी सुरू झाली आहे. याबाबत ठाणे पोलिसांनी गुप्तता बाळगली आहे. कोकासच्या कंपनीच्या खात्यातून या कोरिओग्राफरच्या बँक खात्यात पैसे वर्ग झाल्याचे दिसून आल्याने त्यांना चौकशीकरिता बोलवले होते. आणखी एका बॉलीवूड कलाकाराचीही चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील कासारवडवली पोलीस ठाण्यात सहा महिन्यांपूर्वी सागर आणि श्रुती कोकासविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली होती. सागरने अष्टविनायक टूर्स आणि ट्रान्सपोर्ट सोल्युशन कंपनीला गाड्यांची गरज आहे, अशी बतावणी करत प्रत्येक गाडीमागे दरमहा २७ हजार रुपये देण्याचे आमिष मालाडच्या एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला दाखवले. त्याने कंपनीकडे १२ गाड्या सोपवल्या. कोकासने वर्षभर व्यवस्थित पैसे देत, विश्वास मिळवला. या व्यावसायिकाला कोकासने त्याच्या कंपनीत दोन लाख ५२ हजार गुंतवल्यास प्रतिमहिना १८ हजार रुपये या दराने चार वर्षे व्याज देण्याचे व चार वर्षांनंतर मुद्दल परत करण्याचे आमिष दाखवले. त्याने १० लाख ८ हजार रु पयांची गुंतवणूक केली. मात्र, पैसे मिळत नाहीत तसेच आपल्याबरोबर अन्य तिघांची १० लाखांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याने त्याने तक्रार दाखल केली. चौकशीत कोरिओग्राफरला मिळालेल्या रकमेबाबबत कळले. मात्र, याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.
बॉलीवूडमधील एका कोरिओग्राफरला चौकशीकरिता बोलावले होते, हे खरे आहे. आरोपींच्या कंपनीच्या खात्यातून कोरिओग्राफरच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे दिसून आले आहे. या आर्थिक व्यवहारांची माहिती घेण्याकरिता त्यांना बोलवले होते. मात्र, तूर्त यापेक्षा अधिक माहिती देणे शक्य नाही.
- संदीप भाजीभाकरे, उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे