ठाण्यात १९ मांजरींचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 01:15 AM2020-08-19T01:15:11+5:302020-08-19T01:15:19+5:30
या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोडवरील हिल गार्डन बंगलोज सोसायटीत तब्बल १९ मांजरींचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घोडबंदर रोडवरील हिल गार्डन बंगलोज या सोसायटीत २२ जुलै ते १0 आॅगस्ट या कालावधीत परिसरातील तब्बल १८ मांजरींचा संशयास्पद मृत्यू झाला. १५ आॅगस्ट रोजीदेखील एका काळ्या मांजरीचा संशयास्पद मृत्यू झाला. या मांजरीस १४ आॅगस्ट रोजी रात्री स्थानिक रहिवासी पूजा जोशी यांनी खायला अन्न दिले होते. त्या वेळी ही मांजर अत्यंत निरोगी होती व खेळत होती. परंतु या मांजरीचा दुसऱ्या दिवशी अचानक मृत्यू झाल्याने पूजा जोशी यांना संशय आला. त्यांनी या मृत्यू पावलेल्या मांजरीचे निरीक्षण केले असता तिच्या तोंडातून फेस येत असल्याचे दिसून आले. तिच्या शरीराचा रंगदेखील बदलला होता. यावरून या मांजरीस कुणीतरी विष देऊन मारल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला. त्यानंतर पूजा जोशी यांनी या घटनेची तक्रार चितळसर पोलीस ठाण्यात नोंदवली.
साहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी रोडे व त्यांच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मांजरीचे शव विच्छेदनासाठी परेल येथे पाठविण्यात आले. शवविच्छेदनाचा अहवाल तीन-चार दिवसांत येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात चितळसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.